आदिवासींचे चेहरे समाधानाने खुलले, रानभाजी महोत्सवात २ लाखांची उलाढाल

ठाणे शहरात १५ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या गेलेल्या रानभाजी महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी’, या संकल्पनेवर आधारित ठाणे शहरात १५ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या गेलेल्या रानभाजी महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या उपक्रमातून जवळपास २ लाख रुपये किमतीचा माल विकला गेल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे गेले ५ महिने हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आदिवासी बंधू भगिनींना या उपक्रमामुळे थोडेथोडके पैसे गाठीशी बांधता आले आहेत. 

नियोजनसाठी अत्यंत थोडा वेळ मिळूनसुद्धा साधारणतः १००० जुड्या एवढ्या रानभाज्या आदिवासी बांधवांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी संबधितांचे आभार मानले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर तसेच कार्यक्रमाबाबत जाहिरात करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने प्रतिसाद कसा मिळेल याची चिंता आयोजकांना होती. तरीही ठाणेकर नागरिकांनी विशेषतः या विषयाची कळकळ असणाऱ्यांनी या उपक्रमाला आवर्जून भेट देत आदिवासींकडून त्यांच्या मालाची खरेदी करून उपक्रमाला प्रोत्साहन दिले. या प्रतिसादामुळे येऊरमधल्या या आदिवासी बांधवांच्या चेहेऱ्यावर बऱ्याच काळानंतर आनंद दिसला. आयोजकांनी प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

हा उपक्रम  ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.  प्रदर्शन आणि विक्रीसाठी  सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे ठेवण्यात आले होते. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळ भाज्या, फूल भाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या भाज्या होत्या. प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यामागे औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेल्या या रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे हा हेतू या उपक्रमामागे होता. यापुढे आदिवासी तसेच वंचित घटकांना शेतीमाल विक्रीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृषी विभागाबरोबर असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आयोजकांचा मानस आहे.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *