आदिवासींच्या समृद्धीसाठी १५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री

आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनांवर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. याकरता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी‘, ही संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे धोरण आहे. याच धोरणाला प्रतिसाद देत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरामध्ये उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेदरम्यान नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे.

सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने उद्या प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या नैसर्गिक व सेंद्रिय असून त्या सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांनी आणि औषधी तत्त्वांनी संपन्न आहेत. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळ भाज्या, फूल भाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.

या रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरता रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. रानभाज्या विक्री आणि प्रदर्शनाला जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी अशी विनंती अंकुश माने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ठाणे यांनी केली आहे. 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *