अडुळसा, खोकला व बरंच काही

आपल्याला खोकला झाला, लहान बाळांना कफ झाला की पूर्वीपासून प्रत्येक घरात आवर्जून असायचं ते औषध म्हणजे अडुळसा. अडुळसा ही निसर्गाने आपल्याला दिलेली उत्तम औषधी गुण असलेली वनस्पती मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून अडुळशाचे स्वरूप, त्याचे गुणकारी फायदे आपण आता पाहणार आहोत.

Justicia adhatoda असे अडुळसा वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. हिला इंग्रजीत मलबार नट असेही म्हणतात. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत आढळणारी अडुळसा वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा वनस्पतीचे रोप सुमारे १.२ ते २.४ मीटर उंच वाढते. हिची पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात.

अडुळशाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. इतकेच नव्हे तर ह्रदयरोगापासून बचाव करण्यासाठीही अडुळसा ही वनस्पती उपयुक्त ठरते. उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर या रोगांमध्येदेखील लाभदायक अशी ही वनस्पती आहे.

क्षयरोग – आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितले आहे. अडुळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवून त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिन्यानंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रससुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे.

रक्ताभिसरण – अडुळसा वनस्पतीची फुले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. फुलांचा रस प्यायल्यास रक्त शुध्द होण्यास तसेच रक्तप्रवाह नियमित राहण्यात मदत होते.

खोकला – अडूळशाची पाने पाण्यामध्ये उकळवून त्यात मध मिसळावा. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच, अडुळसायुक्त मिठाईदेखील खाल्ल्यामुळे खोकल्याला आराम मिळतो. अडुळशाचा रस मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांच्या मिश्रणासोबत घेतल्यास कफापासून मुक्तता मिळते.

जंत – अडुळशाची पाने, खोड आणि मुळाची साले, फळे व फुले हे सर्वच भाग जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा दिवसातून 2-3 वेळा सलग ३ दिवस घेतल्याने फार फरक पडतो.

जुलाब – जुलाब किंवा आव पडणे या आजारांमध्ये अडुळसा वनस्पतीच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. अडुळशापासून आयुर्वेदिक पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली असून पानांचा रस पोटाच्या अन्य विकारांसाठीही गुणकारी असतो.

त्वचारोग – जखमा किंवा त्वचेला सूज आल्यास तसेच, खरूज वा अन्य त्वचारोगांसाठी अडुळशाचा काढा गरम करून लावल्यास लवकर गूण येतो.

वापरण्याची पद्धत आणि प्रमाण – अडुळशाच्या पानांचा रस आल्याच्या रसासोबत किंवा मधासोबत घ्यावा. या वनस्पतींच्या ताज्या पानांचा काढा करून प्यावा. खोडाच्या सालींचाही काढा करून प्यायल्यास अनेक आजारांवर तो उपयुक्त ठरतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *