अश्वगंधाचे आरोग्याला वरदान

आयुर्वेदिक उपचारपद्धतींमध्ये किंवा निसर्गोपचारांमध्ये अनेक महत्वाच्या वनौषधींमध्ये अग्रेसर असते ती वनस्पती म्हणजे अश्वगंधा. विदॅनिआ सॉन्मिफेरा असे अश्वगंधाचे शास्त्रीय नाव असून आपल्याकडे आयुर्वेदात तिला वराहकर्णी (डुकराच्या कानांसारखा आकार असलेली वनस्पती) तसेच, कामरुपिणी अशीही नावं आहेत. या वनस्पतीचे मूळ, पाने, फुले आणि बिया या अवयवांचा वापर औषधोपचारांसाठी करता येतो.

अश्वगंधा ही वनस्पती भारतातल्या सर्वांत शुष्क अशा मध्यप्रदेश व राजस्थान या भागात उपलब्ध असून भारताव्यतिरिक्त, नेपाळ, आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांतही ती बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतही अश्वगंधा पोहोचली आहे. मानसिक आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रसिद्ध असलेली अश्वगंधा मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक विकारांवरही रामबाण इलाज करते. अश्वगंधाचे मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि या वनस्पतीचे आपल्याला होणारे फायदे आपण आता पाहणार आहोत.

मानसिक आरोग्य – अश्वगंधा ही वनस्पती म्हणजे एक प्रसिद्ध अडॅप्टोजेन असल्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी हिचा उपयोग होतो.

संधिवात – अश्वगंधा ही अत्यंत गुणकारी दाहशामक वनस्पती आहे. त्यामुळे संधिवात व हाडांशी संबंधित अन्य आजारांवर तसेच, सूज कमी करण्यासाठीही या वनस्पतीचा आयुर्वेदात वारंवार वापर केला जातो.

रोगप्रतिकारक शक्ती – कोरोनासारख्या रोगसंक्रमण काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि असलेली शक्ती टिकवणे फार महत्वाचे ठरते. अशा वेळी, अश्वगंधासारख्या वनौषधी आपल्या मदतीला धावून येतात. ही एक उत्कृष्ट इम्युनोस्टिम्युलेटर वनस्पती निसर्गाने आपल्याला दिलेले वरदान आहे.

लैंगिक आरोग्य – महिला व पुरूष दोहोंमध्ये लैंगिक इच्छा वाढण्यास व त्या नियंत्रणआत ठेवण्यास अश्वगंधायुक्त औषधी उपयुक्त ठरतात. पुरूषांमधील शुक्राणूंच्या संख्येत सुधारणा होण्यासाठी अश्वगंधाचा खूप उपयोग होतो.

पित्त – शरिरातील आम्लाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी व पित्तकारक घटकांचा समतोल राखण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते.

मधुमेहावर नियंत्रण – अश्वगंधा ही एक उत्तम मधुमेहरोधी वनस्पती असून शरिरातली इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हिचा उपयोग होतो. तसेच, निरोगी व मधुमेही अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींमध्ये शरिरातल्या शर्करेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते.

ह्रदयरोग – ह्रदयाचे स्नायू बळकट करून रक्ताच्या गुठळ्या न होऊ देण्यासाठी अश्वगंधा हा एक उतम इलाज आयुर्वेदात सांगितला आहे. शरिरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरत असून यामुळे ह्रदयविकाराचा धोका दूर ठेवता येतो.

महिलांसाठी अश्वगंधा हे वरदान – महिलांमधील संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्वगंधा ही परिणामकारक वनस्पती आहे. रजोनिवृत्तीच्या काळात होणारा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच, महिलांचे एकूण आरोग्य निरोगी राखण्यासाठी ही वनौषधी चांगले काम करते. शरिरातील ऊर्जा पूर्ववत ठेवून आहारांतल्या कमतरता भरून काढण्यात अश्वगंधा अग्रेसर ठरते. महिलांमधील कामेच्छा म्हणजेच लिबिडो वाढवण्यासाठी हा महत्वाचा उपाय आहे.

अश्वगंधाचे अनेक फायदे मानवी शरिराला होतात. त्यामुळे अश्वगंधा ही वनस्पती नेमकी कशी सेवन करावी, कोणत्या स्वरूपात घ्यावी, किती प्रमाणात घ्यावी आणि या वनस्पतीचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) काय आहेत, यावरही आपण आगामी लेखांत प्रकाश टाकणार आहोत.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *