औषधी आहे, पण जरा जपून…

अश्वगंधा वनस्पती म्हणजे काय, ती कशी असते आणि तिचे आरोग्यावर कोणकोणते सकारात्मक परिणाम होतात, कोणत्या आजारांत ती गुणकारी ठरते हे आपण पाहिले आहे. पण याच अश्वगंधा वनस्पतीचे दुष्परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट्सही आहेत आणि या वनस्पतीच्या प्रमाणाबाहेरच्या सेवनामुळे किंवा वापरामुळे आपल्याला त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अश्वगंधा कशा स्वरूपात आणि किती प्रमाणात घ्यावी तसेच, तिचे दुष्परिणाम काय हे आपण या लेखात पाहणार आहोत.

अश्वगंधा वनस्पतीची मूळे पूड स्वरूपात तसेच, सिरप किंवा ज्यूस स्वरुपात ऐतिहासिक काळापासून अनेक आजारांवर उपचार म्हणून घेतली जातात. निद्रानाश, ताप, दमा, खोकला आदी सामान्य आजारांपासून नैराश्य, थकवा या आजारांसाठीही अश्वगंधाची पूड उपयुक्त ठरते. अश्वगंधा पूड किंवा चहाच्या रूपात सर्वांधिक वापरली जाते. तसेच, दूध, तूप किंवा मधासोबतही अश्वगंधा वापरता येते. अश्वगंधाचे टिंक्चर म्हणजेच तिचे अल्कोहोलिक सार आणि कॅप्सूल स्वरूपही प्रसिद्ध असून घ्यायला अत्यंत सोपे असे हे अश्वगंधाचे स्वरूप आहे.

सामान्यतः इतर कोणत्याही औषधांप्रमाणेच अश्वगंधाचे सेवनही आयुर्वेदाचार्यांच्या वा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायला हवे. तिची सामान्य मात्रा म्हणजे चहा, दूध किंवा मधात एखाद दोन चमचे इतके असून कॅप्सूल स्वरूपातील अश्वगंधा दिवसातून दोनदा 1 किंवा 2 कॅप्सूल अशा प्रमाणात घ्यावी. अश्वगंधाची मूळे दूध, मध यांसोबत उगाळल्यास झोपोसाठीचे औषध म्हणून हा रामबाण पर्याय ठरतो. या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून निघते. मधासोबत अश्वगंधाचे दररोज सेवन केल्यास लैंगिक आजारांपासून मुक्तता मिळू शकते. अल्कोहोलमध्ये अश्वगंधा मिसळून तिचे सार तयार केल्यास ते रक्तात मिसळून शरिराची ऊर्जा आणि ताकद वाढण्यास मदत होते.

अश्वगंधाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास तिचा आरोग्याला फायदाच होतो. परंतु, हे प्रमाण चुकले, तर मात्र त्याचे विपरित परिणामही भोगावे लागतात.

  • अश्वगंधा दीर्घकाळ वापरल्यास त्यामुळे डायरिया म्हणजेच अतिसार, गॅस्ट्रिक अल्सर आणि उलटीही होऊ शकते.
  • इतर कोणत्याही औषधांसोबत अश्वगंधा घेण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला घेणे गरजेचे आहे. उदा. मधूमेहींमध्ये रक्तशर्करा कमी करणाऱ्या औषधांसोबत अश्वगंधाही घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यल्प होऊ शकते, याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.
  • गरोदरपणात अश्वगंधा उष्ण पडू शकते व अधिक सेवनामुळे गर्भपातही होऊ शकतो.
  • रक्त पातळ राहण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरत असली तरीही, शस्त्रक्रिया झाल्यानंतर अश्वगंधाचे सेवन करणे टाळावे.
  • ही वनस्पती सेडेटिव्ह असल्यामुळे झोपेच्या गोळ्यांसोबत हिचा वापर करू नये, अन्यथा अति झोप येते.
Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *