माता घाली बाळगुटी…

लहान, अगदी तान्हं बाळ म्हटलं की आपल्या मराठी घरांमध्ये पहिली आठवते ती बाळगुटी. पूर्वी केवळ मूळ वनस्पतींचे काही तुकडे वा कंद दुधात अथवा पाण्यात उगाळून ही बाळगुटी तयार केली जायची. आता या मूळ रुपासोबतच बाजारात रेडी मेड चूर्ण किंवा सिरप स्वरूपातही बाळगुटी उपलब्ध असते. पण, बाळगुटी म्हणजे नेमके काय आणि तिचे नेमके घटक कोणते असतात, हा प्रश्न नवमातांना नेहमीच पडतो.

लहान बाळांची प्रतिकारशक्ती जन्मतः क्षीण किंवा काहीशी कमकुवत असते. ती वाढवण्यासाठी, त्यांचे सर्वच प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या एकूण आरोग्यासाठी थेट रसायनयुक्त औषधे देण्यापेक्षा घरगुती, नैसर्गिक आणि विशेषतः कोणताही अपाय न करणाऱ्या आयुर्वेदाला मान्य असलेल्या घटकांपासून तयार केलेले औषध देणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. म्हणूनच, निसर्ग भरभरून देत असतो, आपण फक्त त्यातलं हवं ते घ्यायचं हे तत्व लक्षात घेऊन लहानग्यांच्या आरोग्यासाठी बाळगुटीचा जन्म झाला.

मुरूडशेंग, वेखंड, बाल हिरडा, जायफळ, समुद्रफूल, दगडफूल, खारीक, हळकुंड, बदाम, लेंड पिंपळी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, सुंठ, डिकेमली, काकडशिंगी, नागरमोथा, अनंतमूळ, गुळवेल या वनस्पतींचा बाळगुटीमध्ये समावेश होतो. चंदन उगाळण्यासाठी पूर्वापार घरात असलेली सहाण या वनस्पतींचे छोटे छोटे भाग उगाळण्यासाठी उपयोगी पडते. आईच्या दुधात, गाईच्या किंवा म्हशीच्या दुधात किंवा पाण्यातही ही गुटी उगाळून आपण बाळाला चाटवू अथवा पाजू शकतो.

बाळगुटीत अंतर्भूत असलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. यामुळे, लहान बाळांमध्ये सर्रास आढळून येणाऱ्या कफ, सर्दी, ताप, अतिसार, बद्धकोष्ठता आदी सामान्य आजारांपासून आपल्या लहानग्यांचे रक्षण आपण आरामात करू शकतो. प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे धाव घेण्यापेक्षा या घरगुती बाळगुटीमधली नैसर्गिक औषधे बाळाच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. बाळगुटीचे घटक आणि त्यांचे गुणधर्म तसेच, बाळाला गुटी नेमकी कशी द्यावी, हेही आपण पुढील काही लेखांमध्ये पहाणार आहोत.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *