बकरा मांस निर्यातीसाठी अद्ययावत सुविधा उभारणार – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

नागपूर, दि. 27 : पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषीपूरक व्यवसायाला चालना देतांना  नागपुरात बकरा  निर्यातीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. मिहान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी (मिहान) प्रकाश पाटील, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. के. एस. कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन आरोग्य अधिकारी डॉ. ए. जी. ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, कस्टम विभागाचे विवेक सिरीह, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेश भुसारी, एमआयएलचे एम. ए. आबेद रुही, कार्गोचे यशवंत सराटकर यावेळी उपस्थित होते.  

टाळेबंदीनंतर पशुसंवर्धन महत्त्वपूर्ण विभाग ठरणार –

टाळेबंदी संपल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन हा महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडले गेले आहे. आतापर्यंत विदर्भासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील बकरा मांस हैद्राबाद येथून निर्यात केले जात असे. मात्र आता नागपुरातूनच बकरा मांस विदेशात निर्यात केले जाणार आहे. भविष्यात नागपूर हे बकरा निर्यातीचे मोठे केंद्र होणार असून, कळमना बाजार समितीमध्ये पशुधनासाठी मोठे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त केंद्र उभारण्यात येणार आहे. निवारा केंद्र आणि विमानतळ असे दोन ठिकाणी निर्यातीपूर्वी पशुधनाची तपासणी करणारे हे देशातील पहिले केंद्र असेल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागातील शेळीपालन महामंडळाकडील आवश्यक निधी तात्काळ मंजूर करून दिला जाईल असे श्री. केदार म्हणाले. 

नियमांचे काटेकोरपणे पालन –

कस्टम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बोकड कापणी, पॅकेजिंग व विक्री आदीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करुन निर्यात केली जाईल. निर्यातीसाठी आवश्यक सर्व तपासण्या कळमना मार्केट आणि विमानतळावर केल्या जातील. देशातील इतर विमानतळाच्या तुलनेत नागपूर येथून जास्त निर्यात होणार आहे. निर्यात करताना चांगल्या प्रतिचे, तात्काळ उपलब्ध होणारे आणि उत्तम पद्धतीचे बकरे उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे भविष्यातील निर्यातीसाठी येथील बकरा निर्यात मार्केटमध्ये मोठी मागणी वाढेल. परिणामी कृषीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळेल. हे काम विहित कालमर्यादेतच पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांनी दिले.  

मोठी बाजारपेठ उभारण्याचे काम सुरु –

विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ शेतीवर विसंबून न राहता, त्यांना कृषिपूरक व्यवसायाकडे वळवून अतिरिक्त उत्पादनाचे स्रोत निर्माण करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर राहणार आहे. विदर्भातील बकऱ्याचा दर्जा आणि चव उत्तम असून मोठी बाजारपेठ उभारण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.   

कृषीपूरक असलेली इतर क्षेत्र लवकर गती घेतील असा विश्वास –

टाळेबंदीनंतर सेवा, उद्योग, व्यापार क्षेत्र वाढीसाठी मोठा कालावधी जावू शकतो. मात्र, कृषीक्षेत्र आणि त्यास पूरक असलेले इतर क्षेत्र यातून लवकर गती घेतील, असा विश्वास व्यक्त करताना श्री. केदार यांनी केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र शासन दोन हजार कोटी रुपयांचा शेळीपालन (गोट फार्मिंग) चा प्रस्ताव पाठवत असून, यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाची समसमान भागीदारी असेल, असे ते म्हणाले.  

कुलगुरु श्री. पातूरकर यांनी इमारत बांधकामाबाबत माहिती दिली. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी बकरा मांस तथा पशुधन निर्यातीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी सुविधा मिहानमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. बकरा निर्यातीसाठी आवश्यक प्राणी विलगीकरण केंद्र, शेड, यांच्यासह सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *