कडू तरीही फायदेशीर – कडुनिंब

आपल्याकडे गुढीपाडवा म्हटलं की आठवते ती म्हणजे कडुनिंबाची चटणी. चवीला कडू लागत असली तरीही कडुनिंब ही फारच गुणकारी, औषधी वनस्पती निसर्गाने माणसाला दिली आहे. नीम म्हणजेच कडुनिंबाचे वैज्ञानिक नाव Azadirachta Indica असे आहे. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारी ही वनस्पती चवीला कडू असल्यानेच त्याला कडुनिंब असे म्हटले जाते.

कडुनिंब या वनस्पतीमुळे मानवी शरिराला फायदे होतातच, सोबतच हवेतील प्रदूषणही कमी होते. कडुनिंबाचा वापर अनेक आजारांवर उपचार म्हणून तसेच, नैसर्गिक शरीरशुद्धीसाठीही केला जातो. जंगलात तसेच शहरी भागातल्या वन्य परिसरातही ही वनस्पती आपल्याला सहज आढळून येते. वर्षभर पुरेशा प्रमाणात कडुनिंबाचा पाला आपल्याला कुठेही उपलब्ध होऊ शकतो. आयुर्वेदात कडुनिंबाच्या अनेक फायद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पानांचा ज्युसही मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. नेमक्या कोणकोणत्या आरोग्यविषयक समस्यांना कडुनिंब फायदेशीर ठरतो ते आता आपण पाहणार आहोत –

त्वचेचे आजार वा त्वचेचे आरोग्य – कडुनिंबात क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे  त्वचेवर याचा वापर केल्यास मुरमं, ब्लॅकहेड्स, पुरळ येणं कमी होतं. तसेच, तेलकट आणि निस्तेज त्वचेवर याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास त्वचा पुन्हा तजेलदार होते.

दमा व अन्य श्वसनरोग – दम्याचा त्रास असेल तर त्यासाठी कडुनिंब ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. कफ, खोकल्यापासून ते श्वास नियंत्रित ठेवण्यासाठीही कडुनिंबाचा वापर उपयुक्त ठरतो. श्वसनाच्या बऱ्याचशा आजारांसाठी कडुनिंब हे दीर्घकाळ परिणाम करणारे औषध आहे.

अल्सर – पोटाच्या विविध विकारांवर कडुनिंब हा रामबाण उपाय आहे. शरीरातील पीएच स्तर नियंत्रणात ठेवून अल्सरवर मात करण्यासाठी याचा वापर केला जातो.

मधुमेह – कडुनिंबाच्या पानांचा उपयोग शरिरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. यामुळे मधुमेहाचा त्रास टाळता येतो तसेच, ज्यांना मधूमेह आधीच झाला असेल, त्यांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. कडुनिंब शरिरात गेल्यानंतर इन्सुलिनप्रमाणे कार्य करते. त्यामुळे, रोज अर्धा कप कडुनिंबाचा रस प्यायल्याने मधूमेहापासून आपला बचाव होऊ शकतो.

पचनप्रक्रियेचे बिघाड – कडुनिंबात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरिराची पचनक्रिया नियंत्रणात राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वात व बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी कडुनिंबाचा रस वा चूर्ण उपयुक्त ठरते.

दातदुखी – दातांच्या आरोग्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा वापर करण्यात येतो. कडुनिंबाच्या काडीने म्हणजेच देठाने दात घासल्यास दातांचे आरोग्य सुधारते आणि दुखणे असल्यास तेही कमी होते.

सांधेदुखी – सांधेदुखी किंवा शरिरातील हाडांसंबंधीच्या कोणत्याही समस्येसाठी कडुनिंबाचा पाला, तेल व पोटात घेण्याचे चूर्ण वा रस फारच गुणकारी ठरतो.

केसांच्या समस्या – केस हा माणसाच्या शरिराचे व रुपाचे सौंदर्य वाढवणारा महत्वाचा अवयव असून लांब केस कुणाला आवडत नाहीत. महिलांसाठी केस हा यूएसपी ठरू शकतो. त्यामुळे, कोंडा, केसगळती, पिकलेले केस या समस्यांसाठी कडुनिंब हा रामबाण उपाय असून कडुनिंबाचे तेल वारंवार केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली राहते व गळतीही कमी होते.

नवमातांमध्ये दुग्धनिर्मिती – प्रसुतीनंतरचे तीन दिवस महिलांना जेवणापूर्वी कडुनिंबाचा रस दिल्यास, वनजात बाळासाठी आवश्यक असलेली दुग्धनिर्मिती योग्य प्रमाणात व लवकर सुरू होते. तसेच, प्रसुती व गरोदरपणात झालेली हाडांची व स्नायूंची झीज भरून निघण्यासाठीही याचा उपयोग होतो.

स्थूलपणा – बेशिस्त जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लहान वयातच स्थूलपणा, लठ्ठपणा व वाढत्या वजनाच्या समस्या दिसून येतात. कडुनिंबाचा पाला चघळल्याने किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने वाढलेले वजन कमी व्हायला मदत होत असून ताजेतवानेही वाटते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *