महिलांसाठी शतगुणी… शतावरी

आजीबाईंच्या बटव्यातल्या अनेक औषधींपैकी एक असलेल्या शतावरीचे अनेक फायदे आहेत तसेच, तोटेही आहेत. पाहु या शतावरी आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः महिलांसाठी कशी गुणकारी ठरते…

कोणताही आजार किंवा एकूणच आरोग्य म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृतीत आजीबाईंच्या बटव्याला पूर्वीपासूनच फार महत्व आहे. घराघरांत असलेल्या जुन्या आज्या, वयोवृद्ध स्त्रियांनी त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून, अभ्यासातून हा खास बटवा तयार केला. त्यात वेगवेगळ्या वनौषधी, पिकं आणि वनस्पतींपासून तयार केलेल्या गुटी, चुर्ण यांचा समावेश अगदी अनादी कालापासून होत आला आहे. अगदी तान्हं बाळ जन्माला आल्यापासून ते गरोदर स्त्रीच्या समस्यांपर्यंत, प्रसुतीनंतरच्या सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठीच्या उपायांपर्यंत सगळ्यावर रामबाण उत्तर या बटव्यात दडलेलं असायचं. या बटव्यातलीच एक महत्वाची औषधी म्हणजे शतावरी.

गरोदर महिला तसेच, नुकत्याच प्रसूत झालेल्या नवमातांसाठी शतावरी ही वनस्पती म्हणजे अमृततूल्य औषधी ठरते. ही वनस्पती फार पुर्वीपासून स्त्रीच्या शरीरात पुनरूत्पादनासाठी व त्यानंतर दुग्धनिर्मितीकरिता वापरली जाते. शतावरी कल्प स्वरूपात गरोदर महिला व नवमाता शतावरीचे सेवन करू शकतात. शतावरी शतमूली, शकाकूल किंवा वाइल्ड अस्पॅरॅगस या नावांनीही ओळखली जाते. या वनस्पतीची अगदी लहान वेल असते. ही प्रामुख्याने भारत व श्रीलंका या देशांत आढळते. हिचे नाव वाइल्ड अस्पॅगॅरस असले तरी सर्वसामान्यपणे भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या अस्पॅगॅरसपेक्षा शतावरी ही अतिशय वेगळे गुणधर्म असलेली वनस्पती आहे. हिच्या कंदामध्ये स्त्रियांच्या व लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशा अनेक औषधी घटकांचा समावेश आहे. यात शतावरीन 1 – 4 आणि सर्सेपोजीनीन नामक सॅपोनीनचे 4 घटक असतात. शतावरीमध्ये रूटिन, क्वेर्टेसिन आणि केमफ्युरोल नामक फ्लॅवेनोइड घटक असतात, यामुळे शरिरातील संप्रेरकांचे कार्य व्यवस्थित नियंत्रणात राहते व महिलांमध्ये दुग्धनिर्मिती चांगल्या प्रमाणात होऊ शकते.

आयुर्वेदामध्ये शतावरीला स्त्रियांसाठीचे शक्तीवर्धक औषध म्हणून गौरवण्यात आले असून मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि रजोनिवृत्तीनंतरचा (मोनोपॉज) त्रास कमी करण्यास शतावरी मदत करते. शतावरी पाचक, अँटी-युक्लीअर, अँटी-ऑक्सिडंट व अँटी-कँसर घटक म्हणूनही कार्य करते. शतावरीमध्ये यकृताचे संरक्षण करण्याचे गुणधर्म अभ्यासांती सिद्ध झाले आहेत.

फायदा तसा तोटाही….

शतावरीचे जसे फायदे आहेत, तसेच तिचे तोटेही आहेत, बरं का.. हृदयाचे किंवा मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. शतावरीचे अति प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. अस्पॅरॅगसची अॅलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे. त्यामुळे, औषधी वनस्पती आहे, म्हणून तिचा सरसकट सगळ्यांनी वापर करण्यापेक्षा डॉक्टरी सल्ल्यानुसार शतावरी घेतल्यास, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *