रोग अनेक, इलाज एक – हळद

सध्याच्या कोरोना काळात या जीवघेण्या रोगापासून आपले संरक्षण करण्यासाठी हळदीचा गरम पाण्यात, दुधात जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला डॉक्टर्स आपल्याला वारंवार देत आहेत.

हळकुंड किंवा पावडर स्वरूपातली हळद आपल्या घरात, दुकानांमध्ये अगदीच सहज उपलब्ध असते. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणत असून हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तिचे शास्त्रीय नाव Kurkum  longa असे आहे. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. ही मूळ भारतीय वनस्पती असून आल्याच्या प्रजातीतील हे ५-६ फुट वाढणारे रोप असते. या प्रजातीच्या मुळांच्या गाठीत हळद मिळते. हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून एक चमत्कारिक द्रव्य म्हणून मान्यता मिळाली आहे.

लग्नात नवरा-नवरीच्या अंगाला हळद लावण्याची आपल्याकडे जी परंपरा आहे, ती काही उगाच नाही. या हळदीचे आपल्या शरिरावर, त्वचेवर खूप सकारात्मक परिणाम होत असून सध्या आपले एकूण स्वास्थ्य निरोगी राखण्यामध्ये हळदीचा मोलाचा वाटा आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मिसळणाच्या डब्यात किंवा एखाद्या मोठाल्या बरणीत हळद भरलेली असतेच. फक्त तिचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा, याची माहिती असणे आवश्यक आहे.

गरम किंवा कोमट दुधामध्ये हळद टाकून ते प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्‍त शुद्ध होते. इतकेच नव्हे तर, त्‍वचेचा रंग उजळतो. ही वनस्पती बारमाही असून ह्रदविकार, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुनही हळदीमुळे प्रतिबंध होतो, पचनक्रियाही सुधारते. त्याचप्रमाणे, जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंडापासून हळद तयार होत असून कोरड्या हळदीने अंग चोळल्यास अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व रंग उजळतो. शरिरातील चरबी कमी करून शरीर सुडौल होण्यासाठी तसेच, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हळद गरजेची आहे. इतकेच नव्हे, तर शरिरातील साखर कमी करून इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यातही हळदीचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे ह्रदयाचे आजार, मधुमेह असलेल्यांनी नियमित हळदीचे सेवन करणे गरजेचे असते.

दुधाप्रमाणेच पाण्यातूनही हळदीचे सेवन करता येते. अनेक समस्यांमुळे, आजारांमुळे अंगावर सूज येऊ शकते. हळदीचे पाणी प्यायल्याने अंगावरची सूज कमी होते व ताजेतवाने वाटते. तसेच, सांधेदुखीवरही हळदीचे पाणी हा योग्य उपाय असू शकतो. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू, थोडी हळद आणि मध मिसळून ते पाणी प्यायल्याने त्याचे अनेक आश्‍चर्यकारक फायदे होतात. हळदीमुळे अचानक लागलेली उचकी थांबते आणि श्वासाचे वेग नियंत्रणात राहतो. हळदीचा धूर किंवा धूप हा श्वसनविकारांवरील पारंपरिक उपचार आहे. तसेच, सर्पदंश, विंचुदंश झाल्यासह पूर्वी हळदीच्या पानात हळद पावडर गुंडाळून तिचा लेप लावत असत. त्यामुळे विष शरिरात पसरत नाही व माणसाचा जीव वाचतो. हळद भाजून तिची पूड आणि कोरफडीचा गर एकत्र करून मूळव्याधावर लावल्यास, मूळव्याध समस्या लवकर बरी होते. हळद आणि गूळ एकत्र घेतल्यास मूत्रपिंडाचे विकार, मूतखडा यापासून बचाव करता येतो.

हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. यामुळेच हळदीला औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्यूमिनमध्ये अॅण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार, आपल्या आहारात अॅण्टिऑक्सिडण्ट्सचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. शारीरिक आजारांसोबतच, मानसिक आजार किंवा तणावापासून दूर राहण्यासाठीही हळद फार उपयुक्त ठरते. ताण कमी झाल्यामुळे हळदीच्या वापरातून निद्रानाशाची समस्याही दूर होते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *