भारताला जांभूळपोळी खाऊ घालणाऱ्या कोकणातल्या छाया भिडे 

प्रक्रियेसाठी आणलेले जांभूळ

जांभूळ हे फळ अनेकांना आवडत असलं तरी त्यावर प्रक्रिया करून त्याचे पदार्थ बनवणं हे काही सोपं काम नाही. जांभूळ मुळातच नाजूक आणि लवकर खराब होणारे असे फळ आहे. पण त्यावर प्रक्रिया करून बनवलेले पदार्थ संपूर्ण भारतात पाठवण्याचे शिवधनुष्य छाया उदय भिडे यांनी पेललंय. थोडी-थोडकी नाही तर वर्षाला ९० लाखांची उलाढाल त्या करतात. त्या जांभूळ फळावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणाऱ्या त्या कोकणातल्या एकमेव महिला उद्योजक आहेत हे विशेष. रत्नागिरीतल्या देवरूख गावात त्यांनी स्थानिक लोकांनाही रोजगार मिळवून द्यायचं कामही केलंय. साधारणपणे  ३५-४० जणांना त्यांनी या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्षाला सुमारे ४० टन जांभूळ त्या प्रक्रिया करतात. भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात त्यांच्या हातच्या जांभूळपोळ्या पोहोचतात. त्यांच्या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

प्रसिद्ध जांभूळपोळी

जांभूळपोळी उत्पादन हे त्यांचं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. पूर्णतः नैसर्गिक ही जांभूळपोळी मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. विशिष्ट हंगामात येणारे हे फळ असल्याने वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी जांभूळपोळीची निर्मिती केली. बाराही महिने ही हा पदार्थ टिकतो. फळ कमी टिकत असल्याने शिवाय बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आसपासच्या परिसरात होणारी जांभळे त्या २०-२२ रुपये किलोने विकत घेतात. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ही पोळी बनवली जाते. कुठल्याही प्रकारचा ड्रायरचा वापर फळे सुकवण्यासाठी केला जात नाही. सूर्यप्रकाशातच ती वाळवली जातात. तसेच पदार्थ टिकवण्यासाठी कुठल्याही रसायनांचा वापर केला जात नाही. 

या उद्योगातली आव्हाने सांगताना त्या म्हणतात, ‘जांभुळ प्रक्रिया हा उद्योग हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबुन आहे. एप्रिल ते मे या साधारण एक ते दीड महिन्याच्या काळात ऊन कडक असले तर माल चार ते पाच दिवसात तयार होतो. या कामासाठी २० ते २५ कामगार लागतात. माल जमा करणारे वेगळे रोज आलेला माल रोजच्या रोज मशीननला देऊन त्याचा उलगड़ा फार जबाबदारीने करणे महत्वाचे आहे कारण दुसऱ्या दिवशी मालाला बुरशी येण्याची शक्यता असते. झालेला माल हवाबंद करुन ठेवावा लागतो. पोळी बनवताना धुळीपासून रक्षण करावे लागते. एकंदरीत हा उद्योग पन्नास टक्के निसर्ग कसा आहे त्यावर अवलंबुन आहे.’

( छाया भिडे यांचा संपर्क: ९४०४१५३०६९, देवरूख, रत्नागिरी )

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *