भाजीत भाजी ‘मेथी’ची..

पालेभाजीवाल्याच्या ठेल्यावर हिरवीगार दिसणारी आणि घरात मसाल्याच्या डब्यात दाण्यांच्या (बियांच्या) रूपात विराजमान झालेली मेथी चवीला कडू असली, तरीही मानवी स्वास्थ्यासाठी फार गुणकारी आहे. मेथीचे डॉक्टरी सल्ल्याने योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक आजारांपासून आपले संरक्षण करता येते आणि अनेक आजारांवर घरातल्या घरात इलाजही करता येतो.

उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो आहे. श्रावण आला की, सणवार आले. सणवार म्हटलं की, पूजाअर्चा आल्या आणि पूजा म्हटलं की उखाणे आले. या उखाण्यांमध्ये वर्षानुवर्षं एक उखाणा सर्रास सगळ्या स्त्रिया आणि पुरूषही फार हौशीने घेतात, तो म्हणजे भाजीत भाजी मेथीची… नवरा बायकोच्या गोड नात्यात उखाण्यात मात्र ही कडू मेथी डोकावते. गंमत आहे नाही.. ही मेथी काही साधी सुधी नाही बरं का.. उखाण्यात घेण्यापुरतंच तिचं महत्व मर्यादित नसून रोजच्या स्वयंपाकात, आपल्या मानवी आरोग्यात आणि स्वास्थ्यातही मेथीला फार महत्वविशेष स्थान आहे. मेथीची भाजी, मेथीची चटणी, मेथी खाकरा, मेथीचे पराठे किंवा ठेपले अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण मेथी वापरतो.

मेथी ही वनस्पती पालेभाजी आणि बिया किंवा दाणे (मसाल्यात किंवा फोडणीत वापरतात ते) स्वरूपात आपल्या रोजच्या स्वयंपाकव्यवहारात आपल्यासाठी उपलब्ध असते. मेथीचे शास्त्रीय नाव ट्रिगॉनॅला फीनम ग्रेकम असे असून प्रकृतीला अतिशय उष्ण असे हे मेथीचे पीक मध्यपूर्व देश, दक्षिणी युरोप आणि पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते.

मेथीच्या बियांना प्राचीन काळापासूनच आयुर्वेदिक उपचारांमध्ये अनन्यसाधारण स्थान देण्यात आले असून हे मेथीदाणे पूड आणि चूर्ण स्वरूपातही उपचारांसाठी वापरले जातात. मधूमेहींमध्ये तसेच, पोटाच्या विविध विकारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मेथीचा वापर मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. आजकाल बाजारात वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या विविध तयार उत्पादनांमध्ये मेथीचा चहा, मेथीच्या गोळ्या आणि मेथी सार ही उत्पादनेही सहज उपलब्ध होतात. चला तर मग, पाहू या मेथी या वनस्पतीचे आरोग्याला होणारे फायदे –

  • रक्तातील साखर नियंत्रणात राहते – मेथीचे दाणे किंवा मेथी पूड ठराविक मात्रेत डॉक्टरी सल्ल्याने नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते आणि मधुमेहापासून आपला बचाव होऊ शकतो. मधुमेहींना आयुर्वेद उपचारांमध्ये मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
  • वजन नियंत्रणात राहते मेथी आणि पाणी एकत्र प्यायल्यास त्याचे आरोग्याला विविध फायदे होऊ शकतात. शरिराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हा उपाय केला जात असून मेथीच्या पाण्यात असलेल्या गॅलॅक्टोमॅनॅन या पदार्थामुळे भूक कमी लागते व परिणामी लठ्ठपणाही येत नाही.
  • पोटाच्या विकारांपासून सुटका – फार पूर्वीपासूनचमेथीच्या दाण्यांचा उपयोग बद्धकोष्ठता किंवा अपचनासारख्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. मेथी ही तंतूमय वनस्पती असल्यामुळे पोटाच्या सर्वच विकारांवर यामुळे ताबा मिळवता येतो.
  • हाडांसाठी उपयुक्त – मेथीच्या बियांमध्ये व भाजीत पॉलिअनसॅच्युरेटेड हे स्निग्धाम्ल असल्यामुळे संधीवात, सांध्यांना आलेली सूज, हाडांचा ठिसूळपणा या समस्यांवर मेथी गुणकारी ठरते.
  • उच्च रक्तदाबापासून बचाव – मेथीच्या बिया पाण्यासोबत नियमित योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरिरातील एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राहते व उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आपण दूर राहू शकतो. मेथीच्या याच गुणामुळे लठ्ठपणापासूनही आपला बचाव होतो.

महिलांच्या आरोग्यासाठी खास वरदान – महिलांना मासिक पाळीचा होणारा त्रास कमी होण्यासाठी तसेच, प्रसुतीनंतरही होणारा रक्तस्त्राव आटोक्यात ठेवण्यासाठी मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजी जेवणात घेण्याचा सल्ला दिला जातो. इतकेच नव्हे तर, पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ऑव्हेरियन सिण्ड्रोम या आजारापासूनही महिलांचे संरक्षण करण्यात मेथी मोलाचा वाटा उचलू शकते. मेथीच्या बियांचे योग्य प्रमाणात डॉक्टरी सल्ल्याने सेवन केल्यास महिलांच्या अंडाशयातील सिस्ट म्हणजेच गाठी कमी होतात, असे म्हटले जाते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *