गोकर्ण फुलापासून चहा आणि सरबत, कोकणी युवकाचा यशस्वी प्रयोग 

क्लायटोरिया टर्नेशिया हे शास्त्रीय नाव असलेली गोकर्ण ही एक वेलवर्गीय, सदाहरित, बहूवर्षायू वनस्पती आहे. संयुक्त पानं आणि एक पाकळी असलेलं हे फुल गायीच्या कानासारखं दिसतं म्हणून नाव मिळालं गोकर्ण. निळा, लेवेंडर, पांढरा, फिकट निळा नी फिकट गुलाबी या पाच रंगात गोकर्ण उठून दिसतो. काही ठिकाणी परागीवहनामुळे वेगळे रंगही बघायला मिळतात. फुल झाडावर सूकून गेलं की हिरवीगार चपटी शेंग धरते नी पुढे वाळून तडकली की सर्वत्र गोकर्ण बहरतो. कोवळ्या शेंगांची फरसबीसारखी भाजी करता येते. पण या फुलापासून पासून चहा किंवा सरबत तयार करता आलं तर ? स्वानंद जोशी या २८ वर्षाच्या  देवरुख (रत्नागिरी) येथे राहणाऱ्या तरुणाने याबद्दलचा प्रयोग घरच्या-घरी यशस्वी करून दाखवला आहे. 

या प्रयोगाबद्दल स्वानंद म्हणतो की, ‘बरेचदा असं होतं की जो विषय मनात असतो तोच फेसबुक, युट्युबवर दिसतो किंवा कुणाच्या बोलण्यातही येतं. सध्या गोकर्ण बहरात आहे. देवांच्या पूजेला थोडी फुलं काढून बाकी झाडावरच असतात. एके ठिकाणी याबद्दल वाचलं नी आश्चर्यच वाटलं कारण गोकर्णाचे एवढे बारीकसारीक उपयोग माहिती नव्हते. गुगल, युट्युब, फेसबुक हे त्रिदेव गोकर्णाचं गुणगान करतायत हे बघून ओळखीच्या एकदोन व्यक्तिंना विचारलं तर गोकर्णाची अजूनच महती कळली. निळ्या गोकर्णाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. तसेच याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. पंचकर्मात याचा वापर त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी आणि शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा, रक्तशुद्धी, त्वचाविकार इत्यादींवर गोकर्ण हे रामबाण औषध आहे. कोड, मूत्रविकार, उच्च रक्तदाब यावरही औषध म्हणून गोकर्णाचा उपयोग केला जातो. पान, फुल, शेंग, साल आणि मूळ या सगळ्यांचा औषधांसाठी उपयोग होतो. चेहऱ्यावरील डाग घालवून फ्रेश लुकसाठी मूळ उगाळून किंवा पानांचा लेप वापरता येतो. म्हणूनच नेहमी अंगणाची शोभा वाढवणारा हा गोकर्ण बहुगुणी आहे. अनेक वर्ष जगणारा हा गोकर्ण असंख्य आजारांवरचं औषध आहे. तो कधीच हरत नाही आणि आजारांना पळवून लावतो म्हणून गोकर्णाला अपराजिता हे नावही मिळालंय. 

अशा गुणकारी गोकर्णाचं नियमीत आणि आकर्षक रुपाट सेवन करायचं झाल्यास ते चहा किंवा सरबताच्या रूपात सेवन करता येऊ शकतं. यासाठी कोमेजलेली किंवा ताजी, कुठलीही निळी गोकर्ण फुलं पाण्यात उकळून साखर घालून याचा चहा करता येतो. एक कप पाणी, दोन निळी गोकर्ण फुलं नी एक चमचा साखर हे प्रमाण. ही फुलं सावलीत वाळवून, पावडर करता येते आणि नंतर कधीही याचा चहा करता येतो. याच गोकर्ण पाकात लिंबूरस पिळला की जांभळा रंग येतो. किंचीत मीठाचा दाणे नी पाणी घालतं की गोकर्णाचं सरबतही छान होतं. गोकर्ण सरबत आणि चहा हे दोन्ही शरीराला ताजंतवानं करतात आणि मरगळ, थकवा दूर करतात. कालपर्यंत फुलं पूजेला नी शोभेला वापरत आलो. निर्माल्य नारळीच्या बुंधात. पण एवढी माहिती मिळाल्यावर मात्र आता गोकर्ण बहुमूल्य आहे हे पटलंय. बाकी उपयोग बघू पण निळंजांभळं गोकर्ण सरबत आणि चहा हे प्रकरण भारीच आवडलंय, असं स्वानंद सांगतो. 

स्वानंद जोशी – ८८३०९०३३२९ 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *