‘आसमान से टपका खजूर में अटका’ ही म्हण खोटी ठरवणारा हरहुन्नरी शेतकरी   

‘अडचण ही शोधाची जननी आहे. कुटुंब आणि मित्रपरिवाराचे सहाय्य असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही’, असं राजाभाऊ देशमुख ठासून सांगतात. आखाती देशातलं प्रमुख पिक अशी ओळख असलेल्या खजूर फळाला महाराष्ट्राच्या मातीत रोवून यशस्वी करून आणि त्यातून नफा कमवण्याची किमया राजाभाऊ देशमुखांनी करून दाखवली. पाण्याची कमतरता, मजुरांची कमतरता आणि त्यातही मुद्दल बुडू नये यासाठीचे प्रयत्न जेव्हा इतर शेतकरी करत होते तेव्हा राजाभाऊंनी आपल्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीतीला अनुसरून कोणते पीक घेता येईल यावर लक्ष केंद्रित केले. माजी नगरसेवक असल्याकारणाने त्यांचं बऱ्याच ठिकाणी फिरणं होत असे. नेमका याचाच उपयोग त्यांनी नवं काहीतरी शिकण्यासाठी करून घेतला. गहू-ज्वारीच्या पुढे जाऊन पीक घेता येत नाही याची त्यांना सातत्याने खंत होती. एकदा मित्र उमेश चव्हाण यांच्या मदतीने  त्यांचं गुजरातला जाणं झालं. तिथे त्यांनी पहिल्यांदा खजुराची शेती पाहिली. अनुभवी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी आपल्या गावी बार्शी, सोलापूर येथे खजुराची शेती करण्याचा निर्णय पक्का केला. अडीच एकर जमिनीत २०० खजुराच्या झाडांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या वर्षी साडेचार लाखांचं उत्पन्न मिळवलं. यंदाही त्यांना इतक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. 

‘आसमान से टपका खजूर में अटका’ ही म्हण खोटी ठरवत त्यांनी खजूर पिक यशस्वी करून दाखवलेच पण त्यात अडकून न पडता त्याही पुढे जात सीताफळाच्या शेतीत शेतीत मिश्र फळबागेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. गोड चिंच, शेवगा, जांभूळ अशी आंतरपिके घेत फक्त एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपिकांमध्येही नफा कमवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सिझननुसार ही पिके येत असल्याने शेती आणि नफ्याचं चक्र त्यांनी सुरूच ठेवलं आहे. पाणी नसलेल्या कोरडवाहू जमिनीत मुद्दलाची चिंता पडलेल्या जमिनीवर त्यांनी मिश्रफळबागेचं पीक घेऊन इतर शेतकऱ्यांना धडा तर दिलाच शिवाय उमेदही दिली. ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा त्यांना यातून होतो. 

मिश्र पिकांतून आर्थिक सुरक्षा मिळत असल्याचे राजाभाऊ सांगतात. यात अभ्यासू वृत्ती कामी आल्याचे ते नमूद करतात. सीताफळ, द्राक्ष, ड्रॅगनफ्रुट अशी पिके ते घेत आले आहेत. कुटुंब एकत्रितपणे काम करत असल्यानेच इथवरच्या प्रवासाचे श्रेय आपल्या कुटुंबाला देतात.  ताज्या खजुराची विक्री ते आपल्या शेतालगतच्या मार्गावरच करतात. बराचसा माल तिथे खपतो. सोबतच बार्शी, पुणे-मुंबईलाही ताजा माल जातो. त्यांच्या शेतात पिकणाऱ्या खजुरांचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्यावरही त्यांचा भर आहे. 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *