ओवा.. तंदुरूस्तीसाठी घ्यावाच..

पोटात दुखणे, वात इथपासून ते बाळंतिणीला व बाळाला धुरी देणे हे सगळे ऐकल्यावर आपल्याला एकच पारंपरिक औषध आठवते ते म्हणजे, ओवा अर्क. हा ओवा आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असून त्याचे अनेक फायदे आपल्याला माहितही नाहीत.

आपल्या घरात पूर्वापासूनच पोट बिघडल्यावर किंवा वाताचा त्रास होत असल्यास ओवा अर्क हे रामबाण औषध आजीच्या बटव्यात असतेच. ओव्याचा हा अर्क ज्या ओव्यापासून तयार केला जातो, तो ओवाही स्वयंपाकात आपण वापरतो. ओव्याच्या बिया म्हणजे घरात आपण वापरत असलेला ओवा जितका परिचयाचा आहे, तितकीच ओव्याची पानेही आपल्या तब्येतीसाठी उत्तम असतात. पाहू या, ओव्याचे आपल्या आरोग्याला होत असलेले विविध फायदे…

पचनक्रियेत सुधारणा – ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर केल्यास उपयुक्त ठरते.

सर्दीसाठी उपयुक्त – सर्दी, खोकला झाल्यास कफ कमी होण्यासाठी ओव्याची धुरी घेण्याचा सल्ला आयुर्वेदात सांगण्यात आला असून ओवा तव्यावर गरम करून कापडाच्या पुरचुंडीने त्याचा शेक छातीला देण्याचेही सुचवले जाते. या उपायाने सर्दीला आराम मिळतो.

पित्त आणि उलटी – पित्ताचा त्रास असेल तर ओवा खाणे हितकारक ठरते. ओव्यासोबतच मीठ आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घेतल्यास अधिक फायदा होतो.

सांधेदुखी कमी होते – ओव्याचे नियमित सेवन केल्यास सांधेदुखीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर ओव्यात अ‍ॅण्टीबायोटिक घटक असल्याने त्वचेचे विकार, खाज येणे किंवा त्वचा लालसर होणे अशा समस्या कमी होण्यास मदत होते.

कामजीवन सुधारण्यासाठी मदत – कामजीवन सुधारण्यासाठी व त्यासाठी कामवासना उत्तेजित करण्यासाठी ओवा फार गुणकारी ठरतो. स्त्री व पुरूष दोघांमध्येही लैंगिक भावना जागृत करण्यासाठी तसेच, संप्रेरकांच्या नियंत्रणासाठी ओवा उपयुक्त आहे.

मायग्रेनवर गुणकारी – ओवा हुंगल्याने किंवा त्याची पेस्ट करून डोक्यावर लावल्याने मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळतो. ओव्यातील ‘थायमॉल’ या घटकामुळे  डोकेदुखीपासून व वारंवार होणाऱ्या मायग्रेनच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.

वजनावर नियंत्रण – वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात ओवा घालून ते पाणी प्यायल्याने वजनावर नियंत्रण मिळवता येते, शरिरातील मेद कमी होऊन तरतरीत वाटते.

बाळंतपणात विशेष उपयोगी – ओवा हा जंतुनाशक असल्यामुळे तसेच, सर्दी खोकल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ओवा गुणकारी असल्यामुळे बाळंत स्त्रीला व बाळाला ओव्या तापवून त्याची धुरी देण्याची पल्याकडे पद्धत आहे. यामुळे शरिरातील जंतुंचा नायनाट होत असून अंगदुखी, कंबरदुखीही दूर होते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *