अळीव.. पोषणमुल्यांचा खजिना

बाळंतिणीला हमखास खायला दिले जातात असे अळीवाचे लाडू केवळ चविष्टच नव्हे तर पौष्टिकही असतात. अळीव खाल्ल्याने रक्तशुद्धीसोबतच फुफ्फुसांचे आरोग्यही सुधारते, पचनक्रिया नियमित राहते व त्वचारोगांपासूनही आपले संरक्षण होऊ शकते.

अळीवाचे लाडू आपल्याला माहित आहेतच. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असलेला अळीव आपल्या आरोग्यसुधारणेमध्ये आणि शरिराच्या मेण्टेनन्समध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो. अळीवामध्ये अनेक पोषकघटक असतात. अळीवाला अहळीव किंवा हाळीव अशीही प्रांतवार वेगळी नावे पडली आहेत. तर, इंग्रजीत अळीवाला Green cress Seeds असे म्हटले जाते. अळीवाचे शास्त्रीय नाव Lepidium sativum आहे. या तेलबिया असून यात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलेट, क, अ व ई जीवनसत्वे, प्रथिने असे अनेक पोषकघटक असतात. त्यामुळे शरिराचे संतुलन साधण्यासाठी व एकूण आरोग्यासाठी अळीव उपयुक्त ठरतात.

अळीव खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे होतात. रक्तशुद्धीसाठी अळीव महत्वाची भूमिका पार पाडत असून हिमोग्लोबिनचे प्रमाणही अळीवामुळे सुधारते. यातील लोह या मुबलक प्रमाणातील धातूमुळे रक्तदोष नाहीसे होऊन अनिमियासारख्या आजारांपासून बचाव करता येतो. इतकेच नव्हे तर, फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यामध्येही अळीव उपयुक्त ठरते. दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी अळीव हा रामबाण उपाय ठरतो. तर, अळीव खाल्ल्यामुळे खोकला, घसादुखीही थांबते. त्यामुळे, आयुर्वेदात अळीव या तेलबियांना कफमारक म्हणून उल्लेखिलेले आहे.

अळीवाची पूड किंवा पेस्ट करून दूध वा मधासोबत त्वचेला लावल्यास त्वचेवरील काळे डाग, कोरडेपणा जाण्यास मदत होते. यातील प्रथिने, ई जीवनसत्व आणि लोह व मॅग्नेशियम या खनिजांमुळे केसही मजबूत होण्यास मदत होते. अळीव या बियांमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच मोठ्या फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोटाच्या सर्व समस्यांसाठी अळीव फायदेशीर ठरतो. बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या त्रासांवर अळीव योग्य इलाज साधते. तसेच, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही अळीवाचा फायदा होतो. दररोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर अळीव कोमट पाण्यातून खाल्ल्याने वजन कमी होते व कोलेस्टेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यात मदत होते.

अळीवाचे लाडू

बाळंतिणीसाठी निसर्गाचे वरदान – अळीवामध्ये असलेल्या प्रथिने व लोह या पोषणद्रव्यांमुळे बाळंतिणीला भरपूर दूध येण्यासाठी अळीव उपयुक्त ठरतात. त्यामुळे, स्तनदा मातांना अळीवाचे लाडू देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसेच, प्रसुतीनंतर होणारा रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठीही अळीव उपयुक्त ठरते.

महिलांसाठी अळीव हे खरेतर वरदानच आहे. अनियमित मासिक पाळीची तक्रार असलेल्या स्त्रियांना अळीव खाल्ल्याने खूप फायदा होत असून यातील फायटोकेमिकल्समुळे इस्ट्रोजेन संप्रेरकाचे नियमन व्यवस्थित होते व मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. तसेच, अळीवामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आल्यामुळे महिला तसेच पुरूषांनाही कर्करोगापासून प्रतिबंध करण्यासाठी अळीवाचा फायदा होऊ शकतो. यातील अण्टीऑक्सिडण्ट्समुळे कर्करोग रोखता येतो.

फायदा तसा तोटाही – बाळंतिणीसाठी अळीव उपयुक्त ठरत असले तरीही, चुकूनसुद्धा गरोदरपणात अळीव खाऊ नयेत. प्रकृतीने उष्ण असलेल्या या अळीव बियांमुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. तसेच, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अळीव खाल्ल्याने शरिरातील आयोडिन कमी होऊन गलगंडासारखे ग्रंथीसंबंधी आजार बळावण्याची शक्यता असते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *