गुणकारी कोरफड

घरातल्या कुंडीपासून रानावनातही सहज वाढणारी कोरफड ही वनस्पती आपल्याला माहित आहेच. कोरफडीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व देण्यात आले असून सर्दी, खोकल्यापासून त्वचारोग किंवा केसांच्या समस्यांसाठीही कोरफड अत्यंत गुणकारी ठरते.

Aloe किंवा Aloe Vera या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेली कोरफड ही वनस्पती तिच्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे तिच्या वर्गातल्या इतर वनस्पतींपेक्षा उजवी ठरते. तिचे शास्त्रीय नाव ॲलो बार्बेडेन्सिस असे आहे. आफ्रिका आणि भारतात बहुतांश प्रमाणात आढळणारी ही बहुवार्षिक वनस्पती असून आयुर्वेदासोबतच चिनी हर्बल मेडिसीन आणि ब्रिटिश हर्बल मेडिसीन या वैद्यकशास्त्रांमध्येही कोरफडीच्या औषधी गुणांची नोंद करण्यात आली आहे. कोरफडीचा रस आरोग्यदायी असून त्यात अ, क, ब १, ब २, ब ३, ब ६ ही जीवनसत्वे, फॉलिक ॲसिड हे घटक असतात. तर, मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजेही यात उपलब्ध असल्याने आपल्या शरिराला कोरफड पोषक ठरते. त्यामुळे, दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा, असा सल्ला अनेक तज्ञ देतात.

कोरफडीच्या रसामधील औषधी गुणधर्मांमुळे आपल्या आरोग्याला विविधांगाने तिचा खूप फायदा होतो. योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने कोरफडीचा वापर केल्यास बाह्य व अंतर्गत उपचार व प्रतिबंधासाठी कोरफड उपयुक्त ठरते. कोरफडीच्या रसामध्ये विविध जीवनसत्वे व खनिजे असल्यामुळे सकाळी उठल्या उठल्या नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून आपण कोरफडीचा रस पिऊ शकतो. यामुळे दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा शरिरात साठवली जाते आणि खूप काळ ताजेतवाने राहण्यास मदत होते.

कोरफडीचा रस हा थंड प्रवृत्तीचा असल्यामुळे रोज सकाळी या रसाचे सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंस्था थंड राहते, कोणताही पचनाचा त्रास उद्भवत नाही. तसेच, पित्त, दाह आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. म्हणूनच, उन्हाळ्यात कोरफडीला अधिक महत्व प्राप्त होते. सांधे व हाडांची जुनी दुखणी असतील, त्यांच्यासाठीही कोरफडीचा रस फार गुणकारी ठरते. दररोज डॉक्टरी सल्ल्याने ठराविक प्रमाणात कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून मुक्तता मिळू शकते. इतकेच नव्हे, तर शरिरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही कोरफड अत्यंत उपयुक्त असून यामुळे ह्रदयरोग, मधूमेह, लठ्ठपणा या जीवनशैलीतून जन्माला येणाऱअया रोगांनाही आळा घालता येतो. परिणामी, शरिरातील अतिरिक्त चरबीही कोरफडीच्या परिणामाने कमी होते व आपले वजनही नियंत्रणात राहते.

सर्दी, खोकला या थंडीच्या दिवसांतील आजारांवर कोरफडीच्या सहाय्याने यशस्वीरित्या मात करता येत असून कोरफडीचा रस वर्षभर नियमितपणे घेतल्यास अशा अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.

कोरफडीचा गर

केस व त्वचेसाठी गुणकारी – केस धुण्यापूर्वी कोरफडीचा गर केसांना लावल्यास कण्डिशनरचे काम कोरफड करते. यामुळे केस मऊसूत होतात आणि केसांच्या आतील त्वचाही कोरडी होत नाही. परिणामी, कोंडा, चाई, केसगळती या समस्या दूर होतात. तसेच, चेहरा व हाता-पायांच्या त्वचेला कोरफडीचा रस लावल्यास त्वचा तजेलदार होते. शिवाय, प्रदुषणामुळे त्वचेवर साचलेले जंतू, मळ यांचाही निचरा केला जातो. भाजलेल्या त्वचेवर कोरफड लावल्यास ते व्रण लवकर बरे होतात व त्वचेला थंडावा मिळतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *