आरोग्यदायी बेलफळ

आज श्रावणी सोमवार. सोमवारी श्री शंकराच्या पुजेमध्ये लागणारी बेलाची पाने आपल्याला माहित आहेतच. बेलाच्या पानांसोबतच बेलफळही आपल्याला माहित असायला हवे. कारण, बेलाच्या फळांचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.   

बेल हा मोठा वृक्ष असून याची पाने, फुले आणि मुख्यतः फळे आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. Aegle marmelos(एगल मार्मेलोस) असे बेल वृक्षाचे शास्त्रीय नाव असून हा वृङा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या उष्णकटबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. साधारण 18 मीटर उंचीपर्यंत वाढणाऱ्या या वृक्षाची पाने शंकराच्या पुजेसाठी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. तर, या वृक्षाला येणारी फळे, अर्थात बेलफळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही फळे गुणकारी आणि चविष्टही असतात.

पोटदुखीपासून मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेलफळे गुणकारी असतात. उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते. बेलफळामधील औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदात या फळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, ते फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतो. चिकट, तंतुमय पदार्थ आणि त्यात असलेल्या मोठ्या प्रमाणातील बिया यामुळे बेल फळ खाण्यासाठी अवघड जाते. अस्थमा, रक्तक्षय, अशक्तपणा, जखमा, सूज येणे, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार अशा अनेक रोगांवर बेलफळ गुणकारी आहे. या फळांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात.

बेलाच्या फळांमध्ये स्टिरॉईड्स, क्युमरिन्स, फ्लॅनोनोयड्स, इन्सुलिन आदी पोषकद्रव्यांसोबत अण्टिऑक्सिडण्ट्स असतात. त्यामुळे ह्रदयासाठीही बेलाची फळे अतिशय उपयुक्त मानली जातात.

मधुमेहविरोधी गुणधर्म – मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो.

बद्धकोष्ठता – बेलाचे परिपक्व फळ सर्वोत्तम रेचक मानले गेले आहे. पिकलेली बेलफळे 2 ते 3 महिने नियमितपणे खाल्यास बद्धकोष्ठतेवर उत्तम इलाज साधता येतो.

अपचनापासून मुक्ती – पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे.

उन्हापासून होणाऱ्या त्रासांवर लाभदायी – दरवर्षी उन्हाळ्यात होणारा त्रास बेलफळामुळे कमी होऊ शकतो. बेलाची ताजी पाने व फळे कुटून मेंदीप्रमाणे तळपायावर लावल्यास किंवा बेलाचे सरबत सेवन केल्यास उन्हाळ्यापासून आराम मिळू शकतो.

गर्भवती महिलांसाठी उपयुक्त – गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास झाल्यास बेलफळे उपयुक्त ठरतात. बेलाच्या फळांचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत घेतल्यास गर्भवती महिलांना आराम मिळतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *