नागवेल.. आरोग्य आलबेल

विड्याची पाने म्हटली की खायच्या पानासाठी सुपारीसह वापरली जाणारे पाने किंवा पुजेत वापरली जाणारी विड्याची पानेच बऱ्याचदा आपल्या मनात येतात. पण नागवेलीचे म्हणजेच विड्याच्या पानांचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक उपयोग करता येतात. अनेक आजारांमध्ये ही पाने आपल्याला संजीवनी देऊ शकतात.

‘रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा..’ ही लावणी ऐकली की आपल्या डोळ्यापुढे येतो तो मस्त हिरव्यागार पानात रंगलेला लालबुंद विडा. हा विडा म्हणजे नेमके काय असते, विड्याची पाने चुन्यासोबत खाण्याव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात त्याचे नेमके महत्व काय आहे, त्या पानांचा आपल्या आरोग्याला नेमका काय आणि कसा फायदा होतो हे आपण आता जाणून घेणार आहोत.

Piper betel असे नागवेल या वेल स्वरूपातल्या वनस्पतीचे म्हणजेच सामान्यतः माहित असलेल्या विड्याच्या पानांचे वनस्पतीशास्त्रीय नाव असून आशियाई देशांतच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. नागवेलीला आयुर्वेदात विशेष महत्व देण्यात आले असून याच्या औषधी गुणांमुळे चरक संहिता या पौराणिक ग्रंथातही या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. नागवेलीच्या पानामध्ये बाष्पशील तेलांसोबतच अमिनो आम्ल, कर्बोदके आणि विविध प्रकारची जीवनसत्वेही आढळतात. या गुणधर्मांमुळेच विड्याची पाने आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात.

वजनावर नियंत्रण – विड्याच्या पानांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि चयापचय क्रियाही सुधारते. या पानांमुळे शरिरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. काळ्या मिरीसोबत रोज विड्याच्या पानाचे सेवन केल्यास काही आठवड्यातच आपल्या वजनावर परिणाम झाल्याचे दिसून येते.

पचनशक्तीत सुधारणा – विड्याची पाने नियमितपणे चावून खाल्ल्यास शरिरातील पचनशक्ती सुधारण्यात मदत होत असून या पानांमुळे लाळ ग्रंथीवर उत्तम परिणाम साधला जातो.

वात समस्येपासून सुटका – पोटाशी निगडीत असलेल्या समस्या, वात यापासून सुटका करण्यासाठी पूर्वीपासून विड्याची पाने खाल्ली जातात. विड्याची पाने प्रकृतीला थंड असतात. त्यामुळे शरिरातील उष्मा व वात यांना समूळ नष्ट करण्यासाठी ही पाने उपयुक्त ठरतात.

कामोत्तेजनेत वाढ – विड्याच्या पानांमध्ये कामोत्तेजना वाढवण्याचा गुणधर्म असून लैंगिक विकार असलेल्यांसाठी नागवेलीच्या या गुणकारी पानांचा उत्तेजित होण्यासाठी फायदा होऊ शकतो. विड्याच्या पानांच्या रसात मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास शरिरातील ऊर्जा कायम राहते.

तोंडाच्या दुर्गंधीवर रामबाण उपाय – विड्याची पाने सुवासिक असतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी किंवा तोंडाच्या कोणत्याही विकारांवर ही पाने उपयुक्त उपचार ठरू शकतात. माऊथ फ्रेशनर म्हणून विड्याची पाने प्रसिद्ध आहेत.

तोंड व हिरड्यांसाठी आरोग्यदायी – विड्याच्या पानांत असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील जीवाणू व श्वसनाशी निगडीत इतर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. विड्याची पाने चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होते आणि दातही चांगले राहतात. तसेच या पानांमुळे हिरड्याही मजबूत होतात.

खोकला किंवा कफ – विड्याची पाने हळदीसोबत चावून खाल्याने खोकला व कफ समस्या दूर होते.

काविळीवर पारंपरिक उपाय – काविळीसारख्या गंभीर रोगावरही आयुर्वेदात विड्याच्या पानांच्या उपचाराचे महत्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक औषधी, चूर्ण विड्याच्या पानात गुलकंदासोबत घेतल्यास काविळीला आराम मिळू शकतो व तापही कमी होतो.

त्वचारोगांवर इलाज – आंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने घातल्यास पाणी शुद्ध होते तसेच, शरिरावरील व्रण, जखमा, खाज-खरूज आदी समस्याही दूर होण्यास हातभार लागतो.

डोळ्यांची जळजळ होत असल्यास – डोळ्यांची जळजळ किंवा डोळे लाल झाल्यास विड्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करून त्याने डोळे धुवावेत. डोळ्यांमधील इन्फेक्शन दूर होण्यास याने मदत होते.

या फायद्यांसोबतच विड्याच्या पाने आणखी अनेक उपयोग आपल्या आरोग्याला होत असतात. महिलांमध्ये श्वेतपदराच्या समस्येवर विड्याची पाने इलाज करतात. इतकेच नव्हे तर, प्रसुतीनंतर दुग्धपानावेळी उद्भवणाऱ्या समस्यांवरही विड्याची पाने उपयुक्त ठरतात. विड्याची पाने खाताना मात्र काही खास काळजी घ्यावी लागते. याच्या अति सेवनामुळे तोंडाचा कर्करोग किंवा अल्सर होऊ शकतो. तेव्हा, या पानांचा वापर करताना तज्ञांचा सल्ला घेणेही महत्वाचे ठरते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *