काकडीचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांत हमखास खावी अशी फळभाजी म्हणजे काकडी. सध्या पावसाळ्यातही काकडीचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात. काकडी कोशिंबीर, सॅलेड अशा विविध स्वरूपात आपल्या आहारात समाविष्ट केल्यास तिचे अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात.

काकडीमध्ये अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे, अनेक आजारांपासून आपले संरक्षण होऊ शकते. तसेच, काकडीमध्ये महत्त्वपूर्ण जीवनसत्वे आणि खनिजांचं प्रमाण जास्त आहे. तिच्यातील कमी कॅलरीजमुळे वजन कमी होण्यासाठीही तिचा सामान्यतः उपयोग होऊ शकतो. काकडीतील जास्तीत जास्त पोषकतत्त्व मिळण्याकरता पिकलेली काकडी खाणे आवश्यक आहे. काकडी सोलून खाल्ल्यास त्यातील फायबरचे प्रमाण कमी होते. तसेच काही जीवनसत्वे आणि खनिजेही कमी होतात. चला तर मग, पाहू या या गुणकारी काकडीचे आश्चर्यकारक फायदे –

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे जातात – डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळे कमी व्हावीत, याकरिता डोळ्यावर काकडीचे काप ठेवावेत. यामुळे डोळ्यांखालील काळपटपणा कमी होतो.

वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी – अनेकांना सातत्याने भूक लागत असते. अशावेळी काकडीचे सेवन केल्यास त्यांचा चांगला फायदा होतो. भूकेवर काकडी फार लाभदायक ठरते. कारण, काकडीमध्ये कॅलरीज नसतात व यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त – आपल्या शरिराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी अँटीऑक्सीडंट्सची आवश्यकता असते. काकडीमधील अँटीऑक्सीडंट्समध्ये फ्लेवनॉईड आणि टॅनिन असते, यामुळे अनेक दुर्धर आजारांपासून आपले रक्षण होऊ शकते.

मधुमेहावर इलाज – काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी काकडीचे साल खाल्ल्याने मधूमेह नियंत्रणात राहतो, असे आयुर्वेद सांगतो. याशिवाय काकडीतील ऑक्सीडंट्समुळे तणावही कमी होतो.

पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी – पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठतेसारखी समस्या असल्यास, आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे. काकडीतील फायबर्समुळे आतड्याच्या बऱ्याचश्या समस्या नियंत्रणात राहतात. काकडीतील पेक्टीन नावाच्या विरघळणाऱ्या फायबरमुळे आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त – काकडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असते. त्यामुळे आपले ह्रदय निरोगी राखण्यासाठी काकडी फार उपयोगी ठरते.

त्वचेसाठी गुणकारी – उष्णतारोधक म्हणून काकडीचा आयुर्वेदात उल्लेख करण्यात आला आहे. काकडी आपल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. त्यामुळे त्वचेला तजेला देणे व त्वचेची चमक टिकवून ठेवणे यासाठी काकडी गुणकारी ठरते.

केसांच्या वाढीसाठी उपयुक्त – काकडीत सिलिकॉन आणि गंधकाची मात्रा असते. त्यामुळे, केसांची लांबी वाढते. यासाठी काकडी, गाजर आणि पालक ज्यूस आहारात समाविष्ट करणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *