हिरव्या दुर्वा, नको तब्येतीची पर्वा

दुर्वांमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रथिने ही पोषणतत्वे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बाप्पाच्या या दुर्वा रस, काढा या माध्यमातून आपल्या पोटात गेल्या, तर त्यामुळे तब्येतीला अनेक फायदे होतात.

आजपासून बरोबर एक महिन्याने आपल्या घरी गणरायाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पा म्हटलं की पहिल्या आठवतात त्या दुर्वा. पावसाळ्यात आणि एरव्हीही बारा महिने रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुटपांमध्ये किंवा शेतात, रानात या हिरव्यागार दुर्वा छान डुलत असतात. Cynadon dactylon असे दुर्वांचे शास्त्रीय नाव असून प्रकृतीने थंड असलेल्या या वनस्पतीला सप्टेंबर-ऑक्टोबर व फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत फुलेदेखील येतात.  बाप्पाला दुर्वांचा हार करताना, श्रावणातल्या पुजांमध्येही दुर्वा वापरताना आपल्या शरिरासाठीही त्या किती महत्वाच्या आहेत, हे माहित करून घेणे गरजेचे आहे. चला तर मग.. पाहू या, बाप्पाच्या दुर्वा आपल्यासाठी कशा उपयुक्त ठरतात…

मधूमेहापासून संरक्षण – दुर्वांमध्ये हायपोग्लायस्मिक इफेक्ट हा गुणधर्म असल्यामुळे मधूमेहीना दुर्वांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. दुर्वांच्या रसामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

रोगप्रतिकारशक्तीत वाढ – दुर्वांच्या रसामुळे शरीराची  रोगप्रतिकारशक्ती सुधारत असून अनेक आजारांपासून आपले आपोआप संरक्षण होऊ शकते.

महिलांसाठी फायदेशीर – पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक आढळणाऱ्या मूत्रपिंड मार्गाच्या विकारावर दुर्वांचा रस हा रामबाण इलाज ठरू शकतो. दह्यासोबत दुर्वांचे सेवन केल्यास मूत्रपिंडविकारांसोबतच मासिक पाळीच्या समस्या तसेच, मूळव्याधही दूर होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर महिलांमध्ये अंगावरून पांढरे जाणे म्हणजे व्हाईट डिस्चार्ज या समस्येलाही दुर्वांच्या रसामुळे आराम मिळू शकतो.

पचनक्रियेत सुधारणा – दुर्वांचा रस नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होत असून बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही मात करता येते. पोट साफ झाल्याने पित्तही होत नाही.

दातांसाठी गुणकारी – दुर्वांमधील काही विशेष गुणधर्मांमुळे तोंडाचा अल्सर होण्यापासून बचाव करता येतो. तसेच, हिरड्यांचेही आरोग्य सुधारते.

त्वचारोगावर उपाय – त्वचेला खाज, लाल चट्टे उठणे आदी त्वचेशी निगडीत समस्यांवर दुर्वांचा पाला वा रस उत्तम उपाय आहे. दुर्वाची पेस्ट करून ती हळदीसोबत त्वचेला लावली, तर त्वचा तजेलदार होते.

रक्तशुद्धीसाठी उपयुक्त – दुर्वांच्या नियमित सेवनामुळे शरिरातील हुमोग्लोबिनचे प्रमाण वाढत असून यामुळे अ‍ॅनिमियावर मात करणे शक्य होते व रक्त शुद्ध राहते. परिणामी, ह्रदयाचे आरोग्यही सुधारत असून मासिक पाळीदरम्यान होणारा त्रासही कमी होतो.

ह्रदयरोगाला प्रतिबंध – दुर्वांमुळे रक्तातल्या साखरेबरोबरच कोलेस्टेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारून ह्रदयरोगापासून आपला बचाव करता येतो.

थकवा दूर होतो – दुर्वांचा रस प्यायल्याने शरिरातील ऊर्जा वाढते आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. विनाकारण आलेला थकवा दूर करण्यासाठी दूर्वा उपयुक्त ठरतात.

निद्रानाश व मानसिक तणावावर इलाज – दुर्वांचा रस वा काढा नियमित घेतल्याने मानसिक ताणतणावावर मात करता येत असून निद्रानाशाची समस्याही कमी होते.

Posted in: Uncategorized