आल्याचे आरोग्यदायी फायदे..

आलेपाक, आल्याच्या वड्या, चहातला आल्याचा मस्त स्वाद, फोडणीत घातलेले आले अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्वयंपाकघरात आले ही वनस्पती राज्य करीत असते. फोडणीला सुगंध देण्याव्यतिरिक्त, हे आले आपल्या आरोग्यालाही नवसंजीवनी देते. पाहू या, आल्याचे आरोग्यदायी फायदे..

आपणा सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात, फ्रिजमध्ये आले ही मसाल्यातली अत्यंत महत्वाची वनस्पती असतेच. कोणत्याही पदार्थाला आल्याची फोडणी दिल्यावर तो पदार्थ जितका खमंग होतो, त्या चवीप्रमाणेच आल्याला आपल्या आरोग्याप्रतिही अनन्यसाधारण महत्व आहे. पावसाळ्याच्या दिवसांत, बाहेर रोगराई पसरलेली असताना सर्दी खोकल्यापासून अन्य संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करण्याकरिता आले ही वनस्पती खूप उपयुक्त ठरते. जमिनीखाली मूळाच्या स्वरूपात वाढणारी आले ही वनस्पती चवीला तिखट असली तरीही, या वनस्पतीचा सुवास पदार्थाची लज्जत वाढवतो. आले वाळवले की त्याची सुंठ तयार होते. आले मूळ भारतीय वनस्पती असून चीन व अन्य देशांमध्येही आल्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आले आयुर्वेदामध्ये वायूनाशक म्हणून प्रसिद्ध आहे. सर्दी खोकल्यापासून कामोत्तेजनेपर्यंत अनेक समस्यांवर आले गुणकारी ठरते.

सर्दी व खोकला – खोकला झाल्यास, आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावा. तर, सर्दी असल्यास आल्याचे तुकडे कोमट पाण्यासोबत घ्यावेत. आल्याच्या चहानेसुद्धा सर्दी बरी होते.

पचनविकार – अपचन, पोटात दुखणे आणि पचनाच्या अन्य समस्यांवर आले हा रामबाण उपाय आहे. पचनविकार होऊ नयेत, यासाठी जेवणानंतर रोज आल्याचा तुकडा चावून खावा. त्यामुळे तोंडामध्ये लाळ तयार होते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

पित्तासाठी गुणकारी – आल्याचा रस, लिंबाचा रस, पुदिन्याचा रस आणि मध हे मिश्रण नियमितपणे घेतल्यास पित्त, उलटी, मळमळ बंद होते.

गर्भारपणातील त्रास – आल्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या उलट्या, मळमळ कमी करण्यास मदत होते. आले आणि मध हे मिश्रण तसेच, लिंबूपाण्यासोबत आले घेतल्यास गर्भारपणातील उलट्या थांबतात व एकूण शरीर आरोग्यपूर्ण राखण्यास मदत होते.

मूळव्याध – आले मूळव्याधीवर रामबाण उपाय आहे. आल्याचा रस, मीठ, लिंबू असे पाचक दररोज किंवा आठवड्यातून तीन-चार वेळा घेतल्यास ते उष्णही पडत नाही व मूळव्याधीसारख्या आजारांवर इतर कोणत्याही औषधोपचारांशिवाय मात करता येते.

लैंगिक समस्या – आल्याचा रस कामोत्तेजक आहे. आल्याचा रस, मध आणि अर्धवट उकडवलेले अंडे रोज रात्री झोपताना साधारण महिनाभर घेतल्यास लैंगिक शक्ती सुधारते व नपुंसकत्व दूर होण्यास मदत होते.

वेदनाशमन – आले वेदनाशामक आहे. डोकेदुखीवर आले खूप उपयुक्त ठरत असून आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावावा, याने डोकेदुखी लवकर बरी होते. या उपायामुळे दाढदुखीही थांबते.

तर, हे आहेत आल्याचे औषधी गुणधर्म… चला तर मग, पाऊस पडतोच आहे सध्या. पटकन आल्याचा गरमागरम चहा पिऊ या आणि आरोग्यालाही तजेला देऊ या…

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *