मेंदीच्या पानावर आरोग्याला बहर

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला’ किंवा ‘मेंदीच्या पानावर’ अशा सदाबहार मराठी गाण्यांमधून आपल्याला ‘मेंदी’ नेहमीच खुणावत आली आहे. ही मेंदी म्हणजे नेमके असते तरी काय, तर एक औषधी वनस्पतीच. या वनस्पतीचे मूळ स्वरूप, तिचे फायदे, तिचा योग्य वापर कसा करावा हे आता आपण पाहणार आहोत.

Lawsonia inermis असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीलाच मेंदीचे झाड म्हणतात. पण प्रत्यक्षात, या वनस्पतीच्या पानांपासून मेंदी म्हणजेच रंगीत पदार्थ किंवा डाय तयार करण्यात येतो. मेंदी ही वनस्पती पूर्वापार भारतीय उपखंडांसोबतच अरब देशांमध्ये तसेच, आफ्रिका खंडाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. काळी मेंदी आणि हर्बल किंवा नैसर्गिक मेंदी असे मेंदीचे दोन प्रकार आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. लग्नाकार्यात हातांना सजवण्याव्यतिरिक्त, मेंदीचे मानवी आरोग्याला अनेक फायदे आहेत.

त्वचेसाठी गुणकारी

मेंदीच्या खोडाची साल काढून तयार करण्यात आलेल्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी त्वचा विकार दूर होतात. तसेच, याचा लेप गळू, जखमा, शरिराचा भाजलेला भाग किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून फार उपयुक्त ठरतो.

उन्हाळ्यात उपयुक्त वनस्पती

उन्हाळ्याच्या दिवसांत पायांची होणारी आग कमी करण्यासाठी तसेच, शरिरातली अतिरिक्त ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी व डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावली जाते. केसांना मेंदीमुळे थंडावा मिळतो. मेंदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे डोक्याच्या भागात झालेल्या जखमा किंवा खपल्याही यामुळे बऱ्या होतात. उन्हाळ्यात केसांत कोंडा होणे, खाज येणे आणि केसांच्या गळतीपासून मेंदीमुळे सुटका बचाव करता येतो. उष्ण हवामानात मेंदीमध्ये दही मिसळल्याने मेंदी अधिक गुणकारी ठरते.

केसांसाठी फायदेशीर

मेंदीतील प्रथिनं आणि जीवनसत्वे केसांना सर्व पोषणतत्त्वे देत असल्यामुळे केस मुळांपासून घनदाट आणि चमकदार बनतात. तसेच, पांढऱ्या केसांवर मेंदी लावल्याने त्यांना नैसर्गिक पिंगट रंग मिळतो आणि उत्तम कण्डिशनिंगही होते.

अन्य आरोग्यदायी फायदे

मेंदीच्या सालीच्या काढ्यामुळे मुतखडा होण्यापासून प्रतिबंध साधता येतो. या पानांचा व सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी केला जातो. या वनस्पतीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म असतात, त्यामुळे पित्त आणि कफ किंवा खोकला यांपासून बचाव होऊ शकतो. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हिना किंवा मेंदीतेल असे म्हणतात.

मेंदीची पावडर किंवा चूर्ण

मेंदीचा वापर कसा करावा..

  • दही आणि मेंदी रात्रभर भिजवून ठेवावी. सकाळी हे मिश्रण केसांना लावून किमान 1 तास तसेच ठेवावे. नंतर साध्या किंवा अगदी कोमट पाण्याने केस धुवून टाकावेत.
  • मेंदीमध्ये चहाचे पाणी, लिंबाचा रस, दही मिसळून रात्रभर ठेवावे. सकाळी वापरावे. वाळल्यावर धुवून घ्यावे.
  • मेंदीमध्ये आवळा, रिठा आणि शिकाकाई पावडर मिसळावी. त्याचबरोबर कॉफी पावडरही वापरू शकतो.

वरीलपैकी कोणतेही मिश्रण आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास त्याचा नक्की फायदा दिसून येतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *