जास्वंदाचे आरोग्यदायी फायदे

जवळपास बाराही महिने सगळीकडे आरामात मिळणाऱ्या जास्वंद फुलाचे व त्याच्या पानांचे आरोग्याला खूप फायदे आहेत. वेगवेगळ्या रंगांत उमलून आपले शिवार सजवणारी जास्वंद ही वनस्पती आपल्या तब्येतीसाठी अनेक अर्थांनी उपयुक्त ठरते.

श्रावणातल्या वेगवेगळ्या पुजाअर्चांमध्ये लागणाऱ्या वनस्पतींचे आरोग्यालाही असलेले फायदे-तोटे आपण सध्या पाहत आहोत. या वनस्पती फक्त सामान्य वनस्पती नसून त्या वनौषधी कशा असतात, हे यातून आपल्याला समजते. आज आपण आपल्या बाप्पाच्या एका लाडक्या फुलाचे आरोग्यदायी महत्व जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पाचे जास्वंद हे लालचुटूक फूल बाप्पाच्या हातात जितके सुंदर दिसते, तसेच ते आपल्या स्वास्थ्यासाठीही पूर्णतः फायदेशीर असते.

Hibiscus rosa-sinensis असे जास्वंद फुलाचे शास्त्रीय नाव असून भारतात जवळपास सगळ्याच प्रदेशात झुडूप स्वरूपातली ही वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. लाल, पांढऱ्या, पिवळ्या रंगाची ही फुले व या वनस्पतीची पानेही रस, चूर्ण, तेल स्वरूपात वापरल्यास आरोग्याला त्याचे बरेच फायदे होतात.

जास्वंद फुलांपासून तयार केलेला काढा शरीरातील कोलेस्टेरोलचे मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी फार उपयुक्त असून जास्वंदाची पाने उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ही पाने पाण्यात घालून ते पाणी उकळून प्यायल्यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते व शारीरिक थकवा दूर होतो. दमा, धाप लागणे, सर्दी या ऋतुमानानुसार होणाऱ्या सामान्य आजारांमध्येही जास्वंदाची फुले गरम पाण्यात उकळून साखरेसोबत हा काढा तयार केल्यास त्रास कमी व्हायला मदत होते. या फुलात असलेल्या क जीवनसत्वामुळे तसेच, याच्या अण्टीऑक्सिडण्ट्स गुणधर्मामुळे श्वसनविकार दूर होतात.

जास्वंदाच्या फुलांचा उपयोग शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवून अनिमिया दूर करण्यासाठीही केला जातो. जास्वंदाच्या साधारण चाळीस ते पन्नास कळ्या वाटून घेऊन त्याचा रस काढावा. हा रस एका घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावा. रोज सकाळी एक लहान चमचा जास्वंदाचा रस दुधाबरोबर घ्यावा. या रसामुळे शरिरातील लोहाची कमतरता दूर होते व ऊर्जा टिकून राहते.

जास्वंदाच्या पानांच्या काढ्यामुळे मूत्रपिंडाचे विविध विकार दूर होतात. मूतखड्याचे प्रमाण कमी होऊन पोट साफ होण्यासही मदत होते. या फुलांचा अर्क घातलेले तेल केसांना लावल्यामुळे केसांचे व डोक्यावरील त्वचेचे आरोग्य व पोत सुधारतो. केसगळती थांबते तसेच, केस पांढरे होण्याचे प्रमाणही कमी होते. आजकाल अनेक शांपूंमध्ये जास्वंदाच्या तेलाचा वापर करतात.

वाढत्या वयानुसार होणारे विस्मरण दूर करण्यासाठी डॉक्टरी सल्ल्यानुसार दुधामध्ये जास्वंदाची पावडर मिसळून दिवसातून दोन वेळा हे पाणी प्यावे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. तसेच, तोंडाचे अल्सर दूर करण्यासाठी व दात, हिरड्यांचे आरोग्या चांगल्या राखण्यासाठीही जास्वंदाची पाने उपयुक्त ठरतात.

महिलांसाठी सूचना – गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भधारणेसाठीची औषधे घेत असताना तसेच, संप्रेरके म्हणजे हार्मोन्सवर उपचार घेत असताना जास्वंदाच्या कोणत्याही औषधाचा वापर करणे शक्यतो टाळावा अथवा डॉक्टरी सल्ल्याशिवाय हे प्रयोग करू नयेत.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *