‘मोहा’चा मोह आरोग्याला..

मोह किंवा महुआ हा वृक्ष आपल्याला ऐकून माहित आहे. पण याबद्दलची तपशीलवार माहिती आणि विशेषतः त्याचे आरोग्यदायी महत्व आपल्याला माहित असेलच असे नाही. आयुर्वेदातही मोह वृक्षाला, विशेषतः मोहाच्या फुलांना आरोग्याच्या दृष्टीने फार महत्व आहे.

मोह ही वृक्ष स्वरूपातली वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Madhuca longifolia असे आहे. उष्ण व कोरड्या जमिनीत वाढणारा हा पानझडी वृक्ष असून भारतात याला आयुर्वेदिक औषधी म्हणून खूप महत्व आहे. मोहाची फुले ही झाडांवर काही मर्यादित काळापर्यंतच उपलब्ध असतात. परिणामी, त्यांचा साठा करण्यासाठीचा कालावधीही मर्यादित असल्यामुळे त्याच्या औषधी गुणधर्मांचा लाभ घेण्यासाठीच्या प्रक्रियेलाही काळाच्या मर्यादा असतात.

पूर्वापासून मोहाच्या फुलांचा उपयोग सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी केला जातो. या प्रकारच्या ताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज, र्‍हामनोज हे घटक असतात. त्यामुळे या फुलांची चवही गोड असते. या फुलांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या फुलांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

मोहाच्या फुलांचा रस अतिशय आरोग्यपूर्ण असून या रसामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे, शरिराची ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी ही फुले गुणकारी ठरतात. त्वचेचा दाह होत असल्यास किंवा डोळ्यांची जळजळ, पित्त या समस्यांमध्येही या फुलांचा रस उपयुक्त असतो. पित्तामुळे होणारी डोकेदुखी, उलट्या यासाठीही हा रस फायदेशीर ठरतो.

मोहाच्या फुलांची पूड किंवा पावडर डॉक्टरी सल्ल्याने घेतल्यास अतिसार, पोटाचे विकार यांपासून मुक्तता मिळू शकते. तसेच, मोहाची भाजलेली फुले कफ, खोकला आणि दम्यासाठी वापरली जातात. वंध्यत्व आणि लैंगिक दुर्बलता अशा आजारांमध्ये दुधात  मिसळून या फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर केल्यास मूळव्याधीवर रामबाण उपचार केला जातो.

स्तनदा मातांसाठी उपयुक्त – मोहाची फुले स्तनदा मातांसाठी वरदान ठरतात. प्रसुतीनंतर दुग्धनिर्मिती अधिक प्रमाणात होण्यासाठी नवमातांना मोहाच्या फुलांचा रस दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *