‘आघाड्या’ची आरोग्यातही ‘आघाडी’

श्रावणातल्या मंगळागौरीच्या पुजेसाठी लागणारी आघाड्याची पाने निसर्गाने माणसाला दिलेली देणगीच आहेत. पुजेव्यतिरिक्त, आघाडा ही वनस्पती आपल्या शरिरालाही अनेक आजारांपासून दूर ठेवते. आजारांच्या प्रतिबंधासोबतच अनेक विकारांवर उपचार म्हणूनही आयुर्वेदात हिचा वापर केला जातो.

आजपासून श्रावण सुरू झाला. श्रावणात आपल्याकडे अनेक व्रतवैकल्ये केली जातात, त्यातलेच एक मंगळागौरीचे व्रत. आज श्रावणातला पहिला मंगळवार. मंगळागौरीच्या पुजेमध्ये एक वनस्पती गरजेची असतेच ती म्हणजे आघाड्याची पाने. आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून ही नेमकी कशी असते, कशी दिसते, तिच्या धार्मिक उद्देशाव्यतिरिक्त वैज्ञानिकष्ट्या आपल्या आरोग्याला तिचे काय फायदे होतात, हे डोळसपणे पाहून मग श्रावण साजरा केला, तर त्याला जास्त महत्व प्राप्त होईल, नाही का?

आघाडा या वनस्पतीला अपामार्ग असेही संबोधले जात असून झुडूप स्वरूपातल्या या वनस्पतीचे खोड ताठ असून पाने लांब असतात. आयुर्वेदानुसार, आघाडा वनस्पतीचे मानवी शरिराला अनेक फायदे होतात.

दम्यावर उपचार – आयुर्वेदात दमा, कफ, खोकला या आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या आघाड्याच्या काही मात्रा सांगण्यात आल्या आहेत. आघाड्याची २५ ग्रॅम पाने २ ग्रॅम मिरीसोबत मिक्सर किंवा पाट्यावर वाटून घ्यावीत. त्या वाटणाच्या गोळ्या करून त्या चघळाव्यात. याने दमा कमी होतो, असे आयुर्वेद सांगतो. तसेच, खोकल्यासाठीही आघाड्याचे चूर्ण किंवा रस घेतल्यास उपयोगी ठरतो.

पॅनक्रियाज ग्रंथींसाठी उपयुक्त – पॅनक्रियाज म्हणजेच प्लिहा. या ग्रंथींना सूज येऊन शरिरातील इन्सूलिनचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. या आजारावर प्रथमोपचार म्हणून आघाड्याचे चूर्ण किंवा रस दह्यासोबत दिला जातो.

पचनविकार – आघाड्याच्या पानांचा रस पाचक म्हणून प्रसिद्ध आहे. या वनस्पतीच्या योग्य प्रमाणातील सेवनामुऴे अपचन आणि मुळव्याध यांना आळा बसतो. पानांचा काढा मधातून किंवा उसासोबत घेतल्यास जुलाब थांबतात.

सर्दी – सर्दीमुळे नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास किंवा नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला एकत्र करून त्याचे चूर्ण तयार करतात. त्यात तिळाचे तेल घालून आटवतात. हे तेल डॉक्टरी सल्ल्याने नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते.

त्वचारोगांवर इलाज – त्वचेवर एखादी जखम झाल्यास, त्या जागी आघाड्याच्या पानांचे चूर्ण वा भस्म करूनबांधून ठेवावे, असे आयुर्वेद सांगतो. इतकेच नव्हे तर, अंगावर येणाऱ्या चामखिळालाही आघाड्यामुळे इलाज होतो.

नेत्रविकार – आघाड्याच्या मुळांचा रस नियमितपणे घेतल्यास दृष्टीदोष, काचबिंदू हे आजार लवकर बरे होतात.

महिलांसाठी उपयोगी – आघाडा वनस्पतीच्या बियांमुळे प्रसुतीच्या वेळी वेदना कमी होतात आणि प्रसुती लवकर व सुरळीत पार पडते, असे आयुर्वेद सांगतो. या बिया पाण्यात उगाळून किंवा वाटून घेऊन त्यांचा लेप बेंबीवर लावावा, त्यामुळे प्रसुतीवेदना कमी होतात.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *