लालबुंद डाळींब.. तब्येतीला वरदान

निसर्गाने आपल्याला दिलेल्या विविध फळांचे रोग्याला बरेच फायदे आहेत. काही फळे ह्रदयासाठी चांगली असतात, काही बलवर्धक असतात, काही त्वचेसाठी उपयुक्त ठरतात तर काही पचनसंस्थेला मदत करतात. डाळींब हे फळही आरोग्यासाठी फार उपयुक्त असते. पाहू या लालबुंद डाळिंबाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात..

डाळींब या वनस्पतीचे शास्त्रीय नाव “प्युनिका ग्रॅनेटम” असे आहे. पित्तनाशक फळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाळिंबाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे झाला. आयुर्वेदात डाळिंबाला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले असून वात-पित्त, कफ, ह्रदयरोग, कर्करोग, त्वचारोग या समस्यांवर डाळींब रामबाण उपाय ठरते.

कावीळ – डाळिंबामध्ये अनेक औषधी गुण आहेत. डाळिंब पित्तनाशक असून कावीळ रोगावरही डाळींब रामबाण इलाज साधते.

उच्च रक्तदाब – डाळिंबाच्या रसरशीत बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी ते एक चांगले औषध आहे.

अतिसार – डाळिंबाच्या आतील पांढऱ्या रंगाच्या बियांमुळे अतिसार रोखता येतो. पोटाचे अन्य आजारही दूर होतात. तसेच, तोंडाचा आणि घशाच्या अल्सरही बरा होतो.

ह्रदयरोगावर उपाय – हृदयाच्या आरोग्यासाठी डाळिंबाचा रस अतिशय उपयुक्त आहे. हृदयविकारापासून दिलासा देण्याचे काम डाळींब करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गूण पार पाडतात. कोलेस्टेरॉलवर डाळींब नियंत्रण ठेवते.

कर्करोग आणि मधुमेहापासून संरक्षण – डाळिंबामधील औषधी गूण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर रोगांपासून दूर राहण्यासाठी उपायकारक आहेत.

त्वचा तजेलदार ठेवते – चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. संतुलित आहारासोबत नियमित डाळींब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.

दातांसाठी उपयुक्त – दातांच्या आरोग्यासाठी डाळींब फायदेशीर ठरते. डाळिंबाचा रस प्यायल्याने दात आणि हिरड्या आरोग्यपूर्ण होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *