कडधान्ये खा.. निरोगी रहा (लेखमालिका)

रोजच्या आहारात सॅलड, गहू, तांदूळ, फळभाज्या, पालेभाज्या यासोबतच कडधान्येही तितकीच महत्वाची असतात. कडधान्ये विविधांगाने आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात. आज आपण सुरू करत आहोत, कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे सांगणारी खास मालिका.. आज एकूणच सर्व कडधान्यांचे आरोग्यदायी महत्व जाणून घेऊन उद्यापासून दररोज एक कडधान्य याप्रमाणे काही महत्वाच्या पिकांची माहिती आपण घेणार आहोत..

आहाराला आणि खिशालाही परवडणारा कुठला पदार्थ असेल, तर तो म्हणजे कडधान्ये. मूग, मटकी, वाल, तूर, चवळी, वाटाणा, कुळीथ, हरभरा, उडीद, मसूर ही काही मुख्य कडधान्ये आपल्या स्वयंपाकघरात हमखास असतातच. त्यांचा आपल्या रोजच्या आहारात सुयोग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापर केल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते. किमान चार व कमाल आठ-दहा तास एखादे कडधान्य पाण्यात भिजत ठेवून त्यानंतर ते कोरड्यावर उसपून घ्यावे. उसपलेल्या कडधान्यांना साधारणतः चार ते सहा तासांत मोड (कोंब) येतात. अशी मोड आलेली कडधान्ये उसळ किंवा सॅलड स्वरूपात खाल्ल्यास त्यातील प्रथिने, खनिजे व अन्य पोषणद्रव्यांमुळे आरोग्याला भरपूर फायदा होतो. साधारणतः सर्वच कडधान्यांचे काही समान आरोग्यदायी फायदे आहेत.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये ड जीवनसत्त्व, खनिजे आणि प्रथिने याचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीराला बरेच फायदे होतात. कडधान्यांत फायबर अधिक असल्याने पचनसंस्था चांगली राहते. रक्ताची कमतरता जाणवत असल्यास मोड आलेले कडधान्य खाण्याचा सल्ला आयुर्वेदानुसार देण्यात आला आहे. यातील लोह व तांब्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तपेशींचा विकास होतो. कडधान्यांचे सॅलड वेळोवेळी खाल्ल्यास वजन कमी होण्यास ही धान्ये मदत करतात. शिवाय, कमी झालेले वजन नियंत्रणातही राहते.

कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर क जीवनसत्त्व असते. यामुळे, केसांची वाढ चांगली होते व त्याचप्रमाणे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच, चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. मोड आलेल्या कडधान्यांमुळे डोळ्यांचे आरोग्यही नीट राहत असून दृष्टीदोष नाहीसा होतो. ह्दयाचे स्वस्थ राखण्यासाठीही कडधान्यांचे सेवन नियमितपणे करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

रोजच्या आहारात कडधान्ये समाविष्ट केल्यास त्याचे अनेक फायदे कालांतराने आपल्याला दिसून येतील. पण त्यासाठी प्रत्येक कडधान्याची नीट माहिती होणे आवश्यक आहे. म्हणूनच, रोजच्या आहारात असायलाच हवीत, अशा काही महत्वाच्या कडधान्यांची माहिती, त्यांचे आरोग्यपूर्ण फायदे आपण आगामी मालिकेत जाणून घेणार आहोत.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *