आरोग्यासाठी उपयुक्त तीळ

तिळाचे तेल, कापसाची वात.. हे संध्याकाळी शुभं करोतिमध्ये म्हणताना तिळाचे तेल म्हणजे नेमके काय हे कदाचित आपल्याला माहित नसते. या तिळाच्या तेलाचा आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. त्वचेपासून ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते.

तीळ ही तेल बी स्वरूपातली फुले येणारी वनस्पती असून आफ्रिका व भारतात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येते. तेलबियांसाठीच या वनस्पतीची बहुतेक सगळीकडे लागवड केली जाते. Sesamum indicum असे तीळ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. तिळाचे तेल आणि तिळाच्या बिया म्हणजेच प्रत्यक्ष तीळ बाह्योपचारांसोबतच वेगवेगळ्या पाककृतींमध्येही वापरले जाते. अंतर्बाह्य उपयोग केल्यानंतर तीळ ही वनस्पती आपल्या शरिराला भरपूर फायदे पोहोचवते. तीळ या वनस्पतीमध्ये खूप खनिजे, ओमेगा स्निग्धाम्ले असतात. त्यामुळे विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत तिळाच्या तेलामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. या तिळाचे आरोग्याला काय काय फायदे होतात, हे जाणून घेण्यासाठी वाचू या खालील मुद्दे….

ह्रदयाचे आरोग्य – तिळामध्ये ओमेगा स्निग्धाम्ल 6 असते. या आम्लामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असून रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तसेच, यात कॅल्शियम, मॅग्नेशियम व सेलेनियम ही खनिजे असल्यामुळे ह्रदयाचे स्नायूही मजबूत होतात.

गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर – गर्भारपणात अत्यावश्यक असलेले फॉलिक आम्ल शरिरात योग्य प्रमाणात राहण्यासाठी गरोदरपणात तिळाचे तेल, तिळाच्या बिया यांचा जास्तीत जास्त समावेश केला जातो. यामुळे बाळाची वाढही योग्य प्रमाणात होते.

त्वचेसाठी उत्तम इलाज – तिळाचे तेल त्वचेसाठी फार उपयुक्त असते. तिळांचे तेल त्वचेच्या रंध्रांमध्ये झिरपते आणि त्यामुळे त्वचेला तजेला येतो व ती मुलायम व्हायला मदत होते. गरोदरपणी आलेले स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठीही तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.

उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त – शरिरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन पित्त, डोकेदुखी, अपचन यांसारखे आजार उद्भवत असल्यास, तिळाचा अधिकाधिक वापर करून ही समस्या दूर करता येते. तिळाच्या तेलाच्या मालिशमुळे पित्त कमी होते.

रक्तदाबावर नियंत्रण – संशोधनांती असे दिसून आले आहे की, तिळातील अण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मांमुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होत असून शरिरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलही यामुळे कमी होते.

योनीमार्गाचा कोरडेपणा दूर होतो – योनीमार्गातील शुष्कपणा म्हणजे कोरडेपणा दूर करण्यासाठी आहारात नियमितपणे तिळाचा वापर करावा. तिळाचे तेल व तेल बिया नैसर्गिक ल्युब्रिकण्ट म्हणून उत्तम कार्य करतात.

हाडांचे आरोग्य सुधारते – तिळाच्या तेलाच्या मालिशमुळे तसेच, आहारात तिळाचा समावेश केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते व संधीवात वा अस्थिभंगासारखे आजार होत नाहीत.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *