टोमॅटोचे आरोग्याला फायदे

स्वयंपाकात टोमॅटोला अनन्यसाधारण महत्व असते. टोमॅटोचा रंग, चव आणि स्वाद या सगळ्यामुळेच पदार्थांत वेगळी मजा येते. टोमॅटोची भाजी, कोशिंबीर, चटणी, सूप अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण टोमॅटोचे सेवन करू शकतो. ही भाजी आपल्या शरिरालाही खूप फायदेशीर असते. लठ्ठपणा, डोळ्यांचे विकार, कर्करोग अशा अनेक आजारांपासून आपले रक्षण करण्याचे काम टोमॅटो करतो.

टोमॅटोचे शास्त्रीय नाव Lycopersicon lycopersicum आहे. टोमॅटोत कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच टोमॅटो शिजवून खाण्यापेक्षा कच्चा टोमॅटो खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा यांचा समावेश होतो. यात टोमॅटो या लालचुटूक भाजीला फार महत्व आहे. चवीच्या दृष्टीने आणि आरोग्याला उपाय या दृष्टीनेही टोमॅटो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारांमध्ये टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरते. पित्ताची तक्रार असल्यास टोमॅटो खाल्ल्याने तक्रार दूर होते.

वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटो खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे. रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे रक्ताचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.

यकृताचे विकार असल्यास टोमॅटो फार फायदेशीर ठरतो. टोमॅटोच्या औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे.

पुरूषांनी जर रोज टोमॅटो खाल्ला तर प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. एवढेच नाही तर, ज्या लोकांना ट्यूमर आहे त्यांचा ट्यूमर कमी होण्यास आणि ट्यूमरची वाढ थांबण्यासही टोमॅटोची मदत होते. तर महिलांनाही गर्भाशय वा पोटाचा कॅन्सर टाळायचा असेल, तर रोज सॅलडच्या रूपात टोमॅटो खाणे आवश्यक ठरते. टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाही तर, लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात टोमॅटोमुळे फायदा होतो. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास त्याचा फायदा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *