आरोग्यस्नेही कोथिंबीर

रोजच्या स्वयंपाकात चवीपेक्षा स्वादासाठी हमखास वापरली जाते ती कोथिंबीर. हिरवीगार पाने असलेली ही वनस्पती केवळ स्वादिष्ट नव्हे तर आरोग्यदायीही आहे. एखादा पदार्थ सजवण्यासोबतच आपल्या स्वास्थ्यालाही आराम पोहोचवण्याचे काम कोथिंबीर लीलया करते.

कोथिंबीर ही वनस्पती आपणा सगळ्यांच्याच स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असते. एखादा पदार्थ सजवण्यासाठी तिचा जितका उपयोग होतो, तितकाच तिचा स्वादही आपल्याला आनंद देतो. ही कोथिंबीर आपल्या तब्येतीसाठीही तितकीच महत्वाची असते बरे का? कोरिॲंड्रम सॅटिव्हम असे कोथिंबीरीचे शास्त्रीय नाव असून वर्षभर सर्वत्र ही वनस्पती सहज उपलब्ध असते. कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्नीदीपक पाचक, तृष्णाशामक म्हणून आयुर्वेदात महत्वाची मानली जात असून तिच्यात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब व क जीवनसत्त्वे, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धाम्ले, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मांमुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही उल्लेख व वापर केला जातो.

रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, पित्त, अन्नावरील वासना उडणे, पोटदुखी, अल्सर, मूळव्याध आदी विकारांना प्रतिबंध होतो. रोज सकाळी कोथिंबीरीची पाने व पुदिन्याची पाने पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी होण्यासही मदत होते.

शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा कमी करण्यासाठी आलं, कोथिंबीर किंवा धने यांचे मिश्रण गरम पाण्यात उकळून प्यायल्याने शरिराची ऊर्जा टिकून राहते. इतकेच नव्हे तर, डोळ्यांच्या आरोग्यासाठीही कोथिंबीर वा धने उपयुक्त ठरतात. स्थूलता कमी करण्यासाठी धने (कोथिंबीर), आवळा पावडर, आलें हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. यामुळे वजन नक्की कमी होते.

कोथिंबीरच्या बिया (धने) मासिक पाळीसाठी अत्यंत उपयोगी असतात. पाळीदरम्यान होणारा त्रास व अति रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यासाठी कोथिंबीर उपयोगी मानली जाते. गर्भवती स्त्रियांना होणारा उलटीचा त्रास कमी करण्यासाठीही कोथिंबीर फार उपयुक्त ठरते. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक म्हणून आयुर्वेदात कोथिंबीरीचा गौरव केला गेला आहे. कोथिंबीर रोज आहारात असल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असून कर्करोगापासूनही बचाव होतो.

कोथिंबीरीमुळे मुखदुर्गंधी दूर होते व पोटातील गॅसही कमी होतो. लघवीला उन्हाळ्यामुळे आग होत असल्यास गरम पाण्यात धने मिसळून ते पाणी प्यायल्यास त्याचा फार फायदा होतो. खोकल्यावरही कोथिंबीर उपयोगी ठरते. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो.

चला तर मग, बाजारात मिळणारी हिरवीगार कोथिंबीर लगेच खरेदी करू या.. भाज्यांवर बारिक चिरून किंवा वड्या स्वरूपात कोथिंबीर आपण सहज खाऊ शकतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *