बाप्पाच्या पत्रीचा आरोग्याला आशिर्वाद (भाग – 2)

गणपती बाप्पाच्या पुजेत लागणाऱ्या पत्रीचे आपल्या स्वास्थ्यालाही खूप चांगले फायदे आहेत. यापूर्वी २१ पत्रींपैकी ७ पत्रींची माहिती आपण वाचली आहे. आता, आज आपण पत्रीतल्या आणखी ७ वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत.

ऑगस्ट महिना जवळ यायला लागला आहे, तसतसे आपल्याला सगळ्यांनाच गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. यंदाचा गणेशोत्सव नेहमीसारखा उत्साही नसला तरीही, सणांचा आनंद वेगळाच असतो. फक्त यंदा, बाप्पा आल्याच्या आनंदात आपल्याला आपले आरोग्यही जपावे लागणार आहे. त्यासाठी बाप्पाच्या पुजेतल्या पत्रीचा उत्तम उपयोग आपण पुजेव्यतिरिक्त स्वतःच्या स्वास्थ्यासाठीही करू शकणार आहोत.

  • शमी (Prosopis cineraria) – शमीची पाने काटेरी असतात. या पानांचा चोथा, चूर्ण किंवा लेप करून मधासोबत पोटात घेतल्यास कफ, सर्दी व त्वचारोगांवरही उत्तम इलाज होतो.
  • आघाड्याची पाने (Achyranthes aspera) – आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवते. ही वनस्पती ज्वर, कफ आणि पोटाच्या आजारांसाठी उपयुक्त असून याच्या बियांपासून केलेल्या खिरीमुळे वजन नियंत्रणात राहते.
  • डोरलीची पाने (Solanum indicum) – पावसाळ्याच्या दिवसांत जमिनीवर मोठ्या प्रमाणात ही पाने वेलीमध्ये उगवतात. डोरलीची पाने पोटाचे आजार, अस्थिदोष आणि कफ या आजारांवर उपयुक्त ठरतात. डोरलीच्या फळांचा लेप डोक्यावर लावल्यास, केसांची वाढ चांगली राहते.
  • कण्हेरीची पाने (Nerium indicum) – कण्हेर ही विषारी वनस्पती असली तरीही मानवी आरोग्यासाठी काळजीपूर्वक वापरल्यास ही गुणकारी वनौषधी आहे. हिचा वापर दमा, ह्रदयरोग, अंगावरील सूज, रक्तविकार, ताप आणि त्वचारोगांवर इलाज म्हणून केला जातो. या वनस्पतीच्या पानांचा लेप जखमांवर लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात.
  • रुईची पाने (Calotropis procera) – रुईच्या पानांचा उपयोग पित्त, वात, संधिवात आणि त्वचारोगांवर केला जातो. या पानांचा लेप दमा, सर्दी, खोकला आणि तापावरही उपयुक्त ठरतो. रुईची पानेही विषारी असल्यामुळे त्यांचा वापरही काळजीपूर्वक करावा लागतो.
  • अर्जुनाची पाने (Terminalia arjuna) – अर्जुन ही बारमाही वनस्पती असून या वनस्पतीच्या खोडाच्या सालामुळे ह्रदयरोगावर रामबाण इलाज होऊ शकतो आणइ ह्रदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. तसेच, त्वचारोग, रक्तविकार, मधुमेह आणि तापातही याचा पयोग केला जातो.
  • गोकर्णाची पाने (Clitoria ternatea) – गोकर्णाचा वेल आपण घराच्या खिडकीतही लावू शकतो. ही पाने कानाभोवताली सूज आल्यास त्यावर उपयुक्त ठरत असून कफ व रक्तविकारांवरही गोकर्णाची पाने फायदेशीर आहेत.

यापुढच्या शेवटच्या भागातही आपण ऊर्वरित ७ पत्रींचे आरोग्यपूर्ण महत्व समजून घेणार आहोत.

क्रमशः

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *