बाप्पाच्या पत्रीचा आरोग्याला आशिर्वाद (भाग – ३)

गणपती बाप्पाच्या पुजेत लागणाऱ्या पत्रीचे आपल्या स्वास्थ्यालाही खूप चांगले फायदे आहेत. यापूर्वी २१ पत्रींपैकी १४ पत्रींची माहिती आपण वाचली आहे. आता, आज आपण पत्रीतल्या ऊर्वरित ७ वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात पाहणार आहोत.

हिरव्यागार दुर्वा, जास्वंदाची फुले आणि हिरवीगार पत्री या पुजासाहित्याने नटलेले बाप्पाचे रूप दरवर्षी आपल्याला लोभसवाणे वाटते. दुर्वा, जास्वंद या निसर्गातल्याच वनस्पतींसोबतच पत्रीतल्या २१ वनस्पतीही बाप्पाला प्रिय आहेत आणि म्हणूनच त्या आपण आवर्जून पुजेत वापरतो. पत्रीतल्या सर्व वनस्पतींची बाप्पाबरोबरच आपल्यालाही ओढ वाटायला हवी, कारण त्या केवळ बाप्पाची सजावटच करत नाहीत, तर आपल्या शरिरासाठीही त्या उपयुक्त असतात.

  • मरव्याची पाने (Mojorana hortensis) – मरवा ही पावसाळ्यात उगवणारी सुगंधी वनस्पती आहे. ही रक्त धातूंवर काम करणारी वनस्पती असून प्रामुख्याने त्वचारोगांवर बाह्योपचार म्हणून वापरली जाते.
  • डाळींबाची पाने (Punica granatum) – डाळींब हे फळ आपल्याला माहित आहे. पण डाळींबाच्या पाने, फुले आणि या फळांची साल यामुळेही आरोग्याला खूप फायदा होतो आपल्यापैकी किती जणांना माहित आहे.. या फळाचा रस रक्तवर्धक आणि बलदायक असून ताप, दाह, अतिसार, पित्त यांसाठी उपयुक्त आहे. या फळाची साल त्वचारोगांवर उपयोगी असून फुलेही रक्तदोषांवर उपाय म्हणून वापरली जातात.
  • देवदारुची पाने (Cedrus deodara) – देवदार या वृक्षाच्या पानांच्या वापरामुळे वात, पित्त, संधिवात आदी आजार बरे होत असून पोटाच्या आजारांवरही ही पाने गुणकारी ठरतात. इतकेच नव्हे तर, मधुमेहावरही ही पाने उपयुक्त होतात.
  • पिंपळाची पाने (Ficus religiosa) – पिंपळाच्या पानांचा उपयोग दमा, खोकला अशा कफविकारांवर केला जात असून याच्या मुळांचा वापर हाडांचे आजार व पोटाच्या विकारांवर केला जातो.
  • जाईची पाने (Jasminum officinale) – जाईची फुले आपल्याला माहित आहेतच. ही फुले हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरत असून या वनस्पतीची पाने जखमांवर उपचार म्हणून वापरली जातात. त्वचारोग, दातदुखी यावरही जाईच्या पानांचा रस किंवा चूर्ण फायदेशीर ठरते.
  • केवड्याची पाने (Pandanus odorotissimus) – केवड्याची पाने बाप्पाला प्रिय आहेत तशीच ती आपल्या शरिरातल्या अनेक रोगांवर उपाय करतात. या पानांमुळे जखम लवकर भरून निघते. केवड्याचा सुगंध मानसिक आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असून याची मूळे मधुमेहींमध्ये उपचार म्हणून वापरली जातात.
  • अगस्तिची पाने (Sesbania grandiflora) – अगस्ति या वृक्षाच्या पानांमुळे मानसिक ताण, बेशिद्धावस्था दूर होते आणि मेंदूचीही ताकद वाढते. तसेच, दृष्टीदोषांवर उपचार म्हणूनही आयुर्वेदात या वनस्पतीचा उपयोग केला जातो. या पानांचा लेप त्वचारोगांवर फायदेशीर ठरत असून डोकेदुखी, ताप, कफ, पित्त या आजारांमध्ये या पानांचा रस नाकावाटे शरिरात सोडले जातो.
Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *