बाप्पाच्या पत्रीचा आरोग्याला आशिर्वाद

बाप्पाच्या पुजेसाठी लागणाऱ्या पत्रीमध्ये २१ वनस्पतींचा समावेश असतो. प्रत्येक वनस्पतीचं बाप्पाच्या पुजेसोबतच मानवी आरोग्यासाठीही वेगळं महत्व असतं.

चातुर्मास म्हटलं की आपल्याकडे सणांची रेलचेल असते. यातच एक घराघरात साजरा होणारा, आपल्या आराद्यमोरेश्वरासाठीची भक्ती, प्रेम दाखवणारा सण म्हणजे गणेशोत्सव. घरात बाप्पा विराजमान झाले, की त्यांच्या पुजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव, सगळी साग्रसंगीत तयारी सुरू होते. या सगळ्यात एक टास्क वाटतं ते म्हणजे, त्यांच्या पुजेत लागणारी पत्री गोळा करणं. ही पत्री म्हणजे दुसरंतिसरं काहीही नसून निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध वनस्पतीच आहेत. आपले सण, आपले बाप्पा आपल्या पुजाअर्चांमधूनही आपल्याला आरोग्याचा असा संदेश देत असतात, हे या पत्रींमुळे दिसून येतं.

चला तर मग… बाप्पाच्या पुजेतल्या या २१ पत्रींचं आरोग्यदायी महत्व आपण आता आगामी तीन भागांत जाणून घेणार आहोत.

  • मोगऱ्याची पानं (Jasminum sambac) – मोगऱ्याची फुलं आपल्या ओळखीची असतात. पण या वनस्पतीची पानंही बाप्पाला प्रिय आहेत. केवळ बाप्पालाच नव्हे तर, आपल्या शरिरालाही ही पाने आवश्यक असतात. मोगऱ्याची पानं जखमांवर लावल्यास जखमा लवकर बऱ्या होतात. यांचा रस किंवा काढा जखमा धुण्यासाठी वापरतात. वेगवेगळ्या त्वचारोगांसाठीही मोगऱ्याची पानं उपयुक्त ठरतात.
  • बेलाची पानं (Aegle marmalose) – ही पानं शरीरावरील सूज आणि वेदना दूर करणारी आहेत. तसेच, शरिरातील दुर्गंधी व घामावरही हा उत्तम इलाज आहे.
  • भृंगराज (माक्याची पानं) (Eclipta alba) – भृंगराज किंवा माका पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणथळ जागी उगवतो. माका केसांसाठी उत्तम मानला जात असून माक्याची पानं तुपात तळून विविध रोगांवर दिली जातात.
  • तुलसी – तुळसीची पानं (Ocinum sanctum) – तुळशीची पानं सर्दी, खोकला, दमा, त्वचारोग, ताप अशा अनेक रोगांवर औषधी ठरतात.
  • पांढऱ्या दूर्वा (Cynodon dactylon) – पावसाळ्याच्या शेवटी दूर्वांच्या ताटव्यात अशा वेगळ्या फिक्या रंगाच्या दूर्वा सापडतात. या प्रकृतीने थंड असल्यामुळे शरिरातील दाह, आम्लपित्त इतकेच नव्हे तर तापावरही हा रामबाण उपाय आहे.
  • बोरीची पानं (Ziziphus mauritiana) – बोरीची पानंही पावसाळ्याच्या दिवसांत सहज उपलब्ध असून या दिवसांत वारंवार होणाऱ्या कफ, सर्दी, खोकला आणि त्वचा रोगांवर उपयोगी पडतात.
  • धोत-याची पानं (Datura metel) – धोतरा ही विषारी वनस्पती असली तरीही, सावधपणे काळजीपूर्वक वापरल्यास हिच्यासारखी दुसरी औषधी वनस्पती नाही. दमा, खोकला आणि त्वचारोगांवर धोतऱ्याच्या पानांचा चोथा बाहेरून लावल्यास आजार लवकर बरा होतो.

२१ पत्रींपैकी ७ पत्रींची माहिती आत्ता आपण वाचली. उरलेल्या १४ वनस्पतींबद्दल जाणून घेऊ आगामी २ भागांमध्ये….

क्रमशः

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *