गहू.. पोषणतत्वांचा खजिना

आपल्या प्रत्येकाच्याच घरात पोळ्यांसाठी वापरला जाणारे गहू हे बहुगुणी धान्य आश्चर्यकारकरित्या आपल्या आरोग्याला फायदे मिळवून देते. गहू हा आपल्या दैनंदिन आहारातला अविभाज्य भाग असून रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा हा मुख्य स्त्रोत असतो. गव्हाच्या पोळ्या (चपात्या), खीर अशा विविध पदार्थांच्या स्वरूपात आपण ही ऊर्जा आहारात समाविष्ट करू शकतो.

जगभरातील लोकांच्या आहारात गहू हे मुख्य पीक समाविष्ट असून पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक मुख्य वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम असे आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत. गहू ही झुबकेदार वर्षायू गवत स्वरूपातली वनस्पती असून यात ग्लायडीन आणि ग्लुटेनीन ही प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे गव्हाचे पोषणमूल्य वाढते.

गहू या धान्याच्या कोंडयामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि खनिजे असतात. अन्नपचनासाठी फायबरची मदत होते. त्याचबरोबर, कार्डिओव्हॅस्कुलर आजारांचा धोका कमी होतो, म्हणजेच ह्रदयाचे आरोग्य व्यवस्थित राहते. गव्हामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यास मदत होते आणि कोलन कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तसेच, गव्हामुळे पोट भरलेले राहते. त्यात असलेल्या मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम या खनिजांमुळे हाडे व सांधे मजबूत राहण्यास मदत होते. तसेच गव्हाच्या कोंड्यात ई आणि ब ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यात गव्हाचा मोलाचा वाटा असतो. इतकेच नव्हे तर, स्नायू व मज्जासंस्थेच्या विकासासाठी व सुदृढतेसाठी गहू महत्वाची भूमिका पार पाडतो.

आहे पोषक तरीही… गहू, गव्हाचे पीठ आरोग्याला पोषक असले तरीही, शिळ्या कणकेच्या पोळ्या म्हणजेच फ्रीजमध्ये आधीच मळून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या आरोग्याला घातक ठरू शकतात. वेळ वाचावा, अन्न वाया जाऊ नये, यासाठी बऱ्याचदा कणीक आधीच मळून फ्रिजमध्ये ठेवली जाते व एखाद दिवसानंतर ती पोळ्यांसाठी वापरली जाते. परंतु, हे शिळे पीठ आंबून त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता होण्याची शक्यता बळावते. वेळेच्या दृष्टीने असे पीठ सोयीचे असले तरीही शरिराला ते तितकीशी साथ देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *