हिरव्या ऋतुसाठी हिरवीगार औषधी..

पावसाळा आपल्याला सगळ्यांनाच हवाहवासा असतो. आता तर पावसाळा सगळीकडे चांगलाच सुरू झालाय. यंदा बाहेर कोरोना असल्यामुळे आपण सगळेच या पावसाचा आनंद घरबसल्या घेत असलो, तरीही पावसाळी आजारपणं, पाण्याचा किंवा गारव्याचा होणारा त्रास काही चुकणारा नाही. तर, या पावसाळी आजारपणांसाठीही निसर्गात असलेल्या काही औषधी वनस्पती आपल्या मदतीसाठी धावून येतात.

पावसाळ्यातली रोगराई, हवेतला दमटपणा, थंडी यामुळे आपल्या आरोग्यावर सुखावह वाटणाऱ्या पावसाळ्याचाही विपरित परिणाम होऊ शकतो. या काळात आपली प्रतिकारशक्ती पणाला लागते आणि त्यासाठी शरिरात अधिक प्रमाणात ऊर्जा उपलब्ध असणेही गरजेचे असते. त्यासाठी, बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांपेक्षा निसर्गातच उपलब्ध असलेली जडीबुटी खास उपयुक्त ठरू शकते.

तुळस, गुडूची, त्रिफळा संयुग, अश्वगंधा, बोरीची पानं, धोतरा आदी औषधी पावसाळ्याच्या दिवसात सहज उपलब्ध असतात आणि त्यांचा आपल्या आरोग्यावर उत्तम परिणाम साधला जातो.

तुळस – तुळशीच्या वापरामुळे शरीरातील कफ पातळ होतो व खोकला कमी होऊन श्वसनमार्ग खुला होतो. श्वसनविकार लवकर बरे होतात. तसेच तुळस अण्टिट्यूसिव्ह (Antitussive) असल्यामुळे या औषधी वनस्पतीच्या वापरामुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात. पावसाळ्याच्या दृष्टीने तुळशीचे महत्व म्हणजे, तिच्यातील अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पावसाळ्यामध्ये आपले संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते.

अश्वगंधा – अश्वगंधा या औषधी वनस्पतीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, कोलेस्टेरॉल कमी करणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आणि मुख्य म्हणजे मलेरियासारख्या तापांना प्रतिबंध करणे ही अश्वगंधाची गुणवैशिष्ट्ये आहेत.

त्रिफळा – त्रिफळा ही एकच वनस्पती नसून त्रिफळा चूर्ण हे बेहडा, आवळा, हिरडा या तीन वनस्पतींपासून तयार केलेले औषध आहे. यातील आवळ्यात असलेल्या क जीवनसत्वामुळे प्रतिकारशक्ती सुधारून पावसाळ्यात सर्दी, खोकला अशा आजारांपासून आपले रक्षण होते. शिवाय, बेहडा आणि हिरडा या वनस्पतीही श्वसनसंस्थेसाठी उत्तम कामगिरी करतात.

गुडूची – गुडूची ही औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. या वनस्पतीच्या वापरामुळे शरिरात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या पांढऱ्या रक्तपेशींचा प्रभाव वाढवता येतो.

धोतरा – धोतरा ही विषारी वनस्पती असली तरीही आवश्यक ती काळजी घेऊन हिच्या पानांचा वापर केल्यास खोकला, सर्दी, दमा या पावसाळी आजारांवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरू शकते.

बोरीची पाने – बोरीची पाने ही त्वचारोगांप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप या सामान्य आजारांवरचा उत्तम उपाय आहेत.

रुईची पाने – रुईच्या चिकाचा गुणधर्म विषारी असला तरीही, रुईची पाने मात्र मानवी आरोग्यासाठी वरदान ठरतात. रुईच्या पानांच्या लेपामुळे सर्दी, खोकला, दमा, धाप लागणे आदी आजारांपासून सुटका होऊ शकते. परंतु, या वनस्पतीचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

याशिवाय, मिरी, बेल, चहापत्ती, आलं, ज्येष्ठमध आदी औषधी वनस्पतीदेखील पावसाळ्याच्या दिवसांसाठी आपल्या घरात फार मदतशीर ठरू शकतात. या औषधींपासून योग्य प्रमाणात गरमागरम काढा तयार केल्यास, सर्दी, खोकल्यासारखे आजार कधी नाहीसे होतील, कळणारसुद्धा नाही. मग, पावसाळ्याचा घरबसल्या का होईना, पण मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपण सज्ज होऊ शकतो.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *