मेंदीला भूलताना जरा सावधान

हवीहवीशी वाटणारी, हातांसोबतच केसांच्या आरोग्यालाही फायदेशीर असणारी सुवासिक मेंदी योग्य प्रमाणात वापरली तर ती नक्कीच आरोग्यदायी ठरते. पण तिला अतिवापर किंवा मजा म्हणून, नखरे म्हणून मेंदीचा अतिरेक केल्यास हे वेड आपल्याला महागात पडू शकतं.

आजकाल बाजारात सहज उपलब्ध असलेल्या मेंदीच्या टॅटूंमुळे तर हातावर फोड येणे, त्वचा कोरडी व लाल होणे, खाज येणे अशा तक्रारी ग्राहक सर्रास करतात. त्यामुळे, मेंदी ही नैसर्गिक वनस्पतीपासून बनवलेली पेस्ट किंवा पूड असली तरीही, तिच्या प्रमाणाबाहेरील वापराचा शरिरावर, त्वचेवर आणि एकूण आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.

डोळ्यांना त्रास – मेंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्याने डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लालसर होणे, सूज येणे, डोळ्यातून पाणी वाहणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, मेंदी लावताना डोळ्यांची काळजी घेणे विशेष महत्वाचे ठरते.

त्वचारोग – आजकाल पूर्णतः नैसर्गिक मेंदी मिळणं अशक्य आहे. मेंदी रंगवण्यासाठी त्यात विविध केमिकल्स टाकली जातात. पॅराफेनिलीन डाय अमाइन हे रसायन मेंदीत मिसळल्यामुळे मेंदी जास्त गडद होते आणि जास्तीत जास्त ग्राहक ती विकत घेतात. मात्र हा घटक मानवी शरिरासाठी घातक आहे. त्यामुळे त्वचेला खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे असे त्वचेचे आजार होऊ शकतात.

केस शुष्क होणे –  केसांना मेंदी लावल्यामुळे केस चांगले दिसतात. मात्र, केसांवर वारंवार मेंदी लावल्यामुळे तिच्यातील रासायनिक घटकांचा केसांवर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे केस शुष्क होतात आणि पुरळ येण्याची शक्यता असते.

लाल रक्तपेशींना अपाय – काही लहान मुलांमध्ये तसेच, प्रौढ व्यक्तींमध्ये 6 ग्लुकोज फॉस्फेट डिहायड्रोजेनची कमतरता असते. अशा व्यक्तींना मेंदी लावणे धोक्याचे ठरू शकते. त्यांच्या शरीरातील लाल रक्तपेशी फुटून शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

पोटाचे विकार – हातांना लावलेली मेंदी चुकून पोटात गेली किंवा एखाद्या लहान मुलाने चुकून मेंदी खाल्ली तर ते मानवी आरोग्यासाठी घातक आहे. मेंदीमधील रासायनिक पदार्थांमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात.

आता, मेंदीचे आपल्या आरोग्यावर होणारे एवढे सगळे विपरित परिणाम वाचल्यावर घाबरून जाण्याचे काही कारण नाही, बरं का.. फक्त, मेंदीचा वापर करताना व करून झाल्यानंतर योग्य काळजी घेतली जाणे महत्वाचे आहे.

हातांना किंवा केसांना मेंदी लावण्यापूर्वी पायाच्या किंवा हाताच्या छोट्याशा भागावर किंवा बोटावर तिची चाचणी करून घ्यावी. केसांना मेंदी लावण्याआधी तेल लावावे, त्यामुळे केस शुष्क होत नाहीत. मेंदी लावल्यानंतर आपल्या केसांना योग्य असलेल्या शाम्पू आणि कण्डिशनरने केस स्वच्छ धुवावेत. मेंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित हात किंवा केस धुवून त्यावर डॉक्टरी सल्ल्याने औषध लावावे. असे झाल्यास, घरच्या घरी उपचार न करता, डॉक्टरांचा सल्लाच घेणे श्रेयस्कर ठरते.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *