विठुरायाच्या तुळशीमाळेशी आरोग्याचीही गळाभेट

विठुरायाची आषाढी म्हटलं की त्याच्या गळ्यात मानाने डुलणारी तुळशीमाळ डोळ्यापुढे येतेच. तुळस… विठ्ठलाला प्राणप्रिय असलेली ही असामान्य वनस्पती. प्राचीन काळापासुन हिंदू घरात तुळस नाही हे क्वचितच दिसत असेल. पण धार्मिकतेपलीकडे विज्ञानात, आधुनिक, आयुर्वेदिक आरोग्यशास्त्रातही तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. एक उत्तम औषधी वनस्पती म्हणून विठुरायाची ही तुळस आज आपल्या आरोग्यासाठीही तितकीच प्रिय आहे.

तुळशीला Holy Basil असेही म्हटले जाते. तिचे धार्मिक महत्व लक्षात घेता, Holy म्हणजेच पवित्र हे विशेषण तिला जोडले गेले असावे. परंतु, वनस्पतीशास्त्रात तुळशीला ऑसिमम सॅन्क्टम असे शास्त्रीय नाव देण्यात आले असून ऑसिमम म्हणजे गंध आणि सॅन्क्टम म्हणजे पवित्र. तुळशीच्या पानांचा नुसता गुंधही खूप सुखावह असतो. सध्या कोरोना काळात सर्दी, खोकला, दमा यांसारख्या वरवर साध्या वाटणाऱ्या आजारांना आपल्या आसपास फिरकू द्यायचे नसेल, तर आपल्या बटव्यामध्ये तुळशीचं बी किंवा घरात तुळशीचं एखादं रोपटं असणं केव्हाही सोयीस्कर ठरेल. बारीक ताप, खोकला, सर्दी या आजारांत तुळस गुणकारी आहे तशीच, तुळशीची पानं डासांनाही दूर पळवतात, हे विशेष.

तुळशीची पानं दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर सुडौल राहते आणि वजन कमी होते. वजन कमी असेल तर सहाजिकच थकवा येत नाही. मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अशा अनेक रोगांवर तुळस उपयुक्त आहे. निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या आयुर्वेदात सांगितल्या आहेत. एकाग्रता वाढवण्याचा गुणही तुळशीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना तुळशीचा विशेष फायदा होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचाही गुण आहे.

या गुणांमुळेच जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सिरप, गोळ्या आणि तेलंही बनवण्यात आली आहेत. आज केवळ भारतातच नव्हे तर, जर्मनी, अमेरिका, कॅनडा, नार्वे, स्पेन, इटली आणि ब्राझील आदी देशांतही तुळशीला औषधी वनस्पती म्हणून मान्यता मिळालेली आहे. तुळशीचा चहा हा तर निसर्गौपचाराचा एक खास आविष्कार आहे.

मानवी शरिरासोबतच एकूण पर्यावरणावरही तुळस सकारात्मक प्रभाव टाकत असून हवा शुद्ध ठेवण्यामध्ये तुळशीचा मोलाचा वाटा आहे. रोगसंक्रमणाचे प्रमाणही तुळशीमुळे कमी होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

तर अशी ही आपल्या विठोबाची तुळस आपले आरोग्य राखण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि एकूण मानवी स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. विठुरायाच्या भक्तीसोबतच तुळशीचं एक रोप आपण प्रत्येकाने आपल्या घरात, आवारात, अंगणात लावण्याचा संकल्प आजच्या आषाढी एकादशीनिमित्ताने करायला हरकत नाही.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *