जनावरांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी घरच्या घरी उपाय

पाळीव जनावरांच्या पचनसंस्थेचे आजार अनेकदा शेतकऱ्याच्या किंवा त्याच्या पालकांच्या चिंतेत भर घालतात. मुख्यत्वे जनावरांना देण्यात येणाऱ्या अन्नात खनिजांचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्या पचनसंस्थेत बिघाड होतो. लालमुत्र, किटोसिस, दूधज्वर हे आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये दिसून येतात. जनावरांच्या पचनसंस्थेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आहारात खनिजांचा समावेश करावा.

आपलं जनावर सुदृढ आणि ठणठणीत असावं असं प्रत्येक मालकाला वाटतं. जनावरांच्या निरोगी राहण्याने त्यांचे शरीरचक्र, शरीरातल्या प्रक्रिया आणि ऊर्जा कायम टिकून राहते. यामुळे त्यांना पुरेशी पोषणमूल्ये मिळणे आवश्यक ठरतं. यासाठीच त्यांच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, कर्बोदके, मेद, क्षार आणि पाणी यांचा नियमित समावेश असावा.  यातला एकही  घटक त्यांच्या आहारातून कमी झाला तर त्याचा परिणाम लगेच तब्येतीवर झालेला दिसून येतो. मुळातच जनावरे खात असलेल्या चाऱ्यामध्ये पोषणमूल्ये कमी असतात. याचं कारण म्हणजे जमिनीत कमी झालेली खनिजे. 

गाई-म्हशींच्या पुनरुत्पादनाच्या काळात शरीराला कॅल्शिअमचा नियमित पुरवठा होणं गरजेचं असतं. यामुळे वासराची वाढ खुंटण्याचा किंवा प्रसूतींमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो. फॉस्फरसच्या अन्नातील कमतरतेमुळे पाळीव जनावरांना पिका आणि लालमुत्र हे आजार जडतात. 

– जनावरांना खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी प्रमाणात लागत असली तरी त्यांचा आहारातला समावेश कमी असायला नको. नियमित आणि पोषक आहार वेळोवेळी मिळणं हे जनावरांना गरजेचं आहे. 

– खनिज मिश्रणाचा जनावरांच्या आहारात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार समावेश असावा 

– आहारात खनिजांचा योग्य समावेश असल्यास त्याचा चांगला परिणाम जनावरांच्या  तब्येतीवर दिसून येतो. त्यांच्या प्रजोत्पादन, दूध उत्पादन, शारीरिक तंदुरुस्ती आणि रोग प्रतिकारक क्षमतेत वाढ होते. 

जनावरांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी घरच्या घरी उपाय:

– घरातलं खरकटं पाणी जनावरांसाठी उत्तम पोषक ठरू शकतं. खरकट्या पाण्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने जनावरांना ते पोषक आणि उपकारक ठरतं. 

– वाळलेल्या ज्वारीचा कडब्याने जनावरांच्या पोटाचा पीएच संतुलित राहतो आणि पचनसंस्थेचं काम सुरळीत चालू राहतं. 

– जनावरांच्या खाण्याच्या पद्धती आणि चाऱ्याचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. खाल्लेला चारा नीट अंगी लागण्यासाठी रवंथ करण्यासाठीचा १४ तासांचा अवधी जनावराला देणं गरजेचं आहे. 

डॉक्टर यशवंत वाघमारे 
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), वैजापूर तालुका, सदस्य – महाराष्ट्र पशुवैद्यक परिषद 
संपर्क- ९४२२००६९१३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *