लॉकडाऊनला संधी मानत तिचं सोनं करणाऱ्या प्रक्रिया उद्योजक – नंदा भुजबळ

लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काबाडकष्ट करून तयार झालेला माल कुठेही विकायचा हा प्रश्न समोर आ वासून उभा होता. फळं, पालेभाज्या, फळभाज्या असेच शेतात सडून जात होते. या अडचणीवर मात करण्यासाठी नंदा भुजबळ यांनी कंबर कसली. तयार मला जास्त दिवस कसा टिकवून ठेवता येईल यासाठी त्यांनी मैसूरला प्रक्रिया उद्योगाचे पाच दिवसांचे ट्रेनिंग घेतले. त्यामध्ये पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य ,फळं, कांदा इ,सोलर ड्रायर मध्ये वाळवून  पँकिंग करून ठेवले तर बारा महिने ते टिकून राहतात. मुख्य म्हणजे यामुळे शेतकऱ्यांनचा माल वाया जात नाही. सोबतच  प्रक्रिया उद्योगामुळे नवीन रोजगार उपलब्ध होतो आणि ग्राहकांनाही पौष्टिक अन्न खायला मिळतं. यात पुढचे पाऊल उचलत त्यांनी आज सोलरड्रायरचा नवीन प्रकल्प सुरु केला आहे. नंदाताईं वर्षाला ३० ते ३५ लाखांची उलाढाल करतात. या उद्योगातून त्यांनी ६-७ स्थानिकांना रोजगारही उपलब्ध  करून दिला आहे. आदरणीय श्री.पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला तो आपल्या आयुष्यातला सोनेरी क्षण आहे हे त्या आवर्जून सांगतात. आतापर्यंत त्यांना विविध संस्थांकडून पाच-सहा पुरस्कारदेखील मिळाले आहेत. त्यांचा हा प्रवास कोणत्याही धडपडणाऱ्या नवख्या उद्योजिकेला प्रेरणा देणारा असाच आहे. 

नंदाताईंच्या सोलार प्रक्रिया उद्योगाचे आज उद्घाटन झाले.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी श्री. चौधरी आणि श्रीमती चौधरी उपस्थित होत्या.

त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दात

‘मी एका सर्वसामान्य घरात वाढली. दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर डी. एड ला प्रवेश मिळाला असूनही  फक्त हॉस्टेलला राहावं लागणार यासाठी घरून विरोध होता त्यामुळे शेवटी माझं शिक्षणाचं स्वप्न पूर्णत भंगलं. बालपण पुण्यातच गेल्यामुळे शेती म्हणजे नक्की काय हेच माहित नव्हतं, तरीपण वडिलांचा शेतीवर गाढ विश्वास होता. याखातर माझं लग्न शिक्रापूर (ता.शिरूर, पुणे) गावामधील शेतकरी कुटुंबातील पांडुरंग भुजबळ यांच्याशी झालं. सासरची मंडळी फार सुशिक्षित नसली तरी खूप समजदार आणि प्रेमळ होती. लग्नानंतर मी जमेल तसं  हळू-हळू शेतीची कामं करू लागले. यामुळे माझी शेतीविषयी आवड निर्माण होत गेली. तेव्हापासूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. शेतीबरोबरच अंगणवाडी शिक्षिका तसेच पोस्टाच्या आरडीची एजन्सी घेऊन १६ वर्षं काम केलं आणि त्यातूनच लोकांचा विश्वास संपादन करण्यात मला यश आलं.’

‘२०१५ साली कृषी विभागाकडून महिला शेतकरी बचतगट स्थापन करण्याची योजना आली आणि एकूण ३९३ महिला मिळून एकूण १२ बचत गट तयार केले. तेव्हापासूनच कृषिकन्या सेंद्रिय शेती बचत गटात काम करू लागले. कृषी विभागाच्या तसेच ‘आत्मा’अंतर्गत होणाऱ्या विविध ट्रेनिंग मध्ये बेंगलोर, म्हैसूर, नागपूर, मुंबई,बारामती, जयपूर, पुणे इत्यादी ठिकाणी भाग घेऊन प्रक्रिया उद्योग तसेच मार्केटिंग बाबत माहिती घेण्याची संधी मिळाली.

‘एकदा पुण्यातील साखर संकुलात तांदूळ महोत्सव आयोजित झाला असताना मी आणि माझ्या बचत गटातील महिला घरच्या डाळी आणि घरच्या बाजरीचे पीठ घेऊन पहिल्यांदाच घराबाहेर पडल़ो. तिथे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले इथे फक्त तांदळाचे स्टाँल लावता येतो डाळींचा नाही. तुम्हाला इथे जागा मिळणार नाही,असे काही लोकांनी सांगितले. मग मनाशी निश्चय केला आणि तिथेच उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी, माननीय वनपाल सर, बोरकर सर, निर्मल सर यांची भेट घेतली आम्ही पन्नास कि.मी वरून पहिल्यांदाच घराबाहेर पडल्याने चालू दिवसाला थोडीशी जागा मला दिली. मला मिळालेली ती एक एक सोनेरी संधीच होती. नेलेला सगळा माल पाच वाजताच संपला. ग्राहकांना घरी बनवलेल्या डाळीच पाहिजे होत्या म्हणून मग मला न मागताच दुसऱ्या दिवशी परवानगी देण्यात आली. अशा प्रकारे  माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून प्रत्येक धान्य महोत्सव असो, तांदूळ महोत्सव असो किंवा भीमथडी यात्रा असो मला प्रत्येक ठिकाणी विनामूल्य स्टॉल मिळू लागले. ग्राहकांना डाळींची,धान्याची चव आवडली, एकीकडे मॉलधारकांची मागणीही वाढू लागली. एक किलो ते पाच किलोचे पॅकिंग न घेता दहा किलो ते पंचवीस किलोचे पँकिंग मागू लागले. मागणी वाढल्यामुळे आपण बाहेरून (डाळ मिलमधून) डाळ बनवून घेत होतो त्यामुळे खर्च जास्त होत होता नफा आणि अगदी थोडा. खूप विचार करून डाळ मिल आपण स्वतः उभी करु असे ठरवले. सर्वात मोठा प्रश्न भांडवलाचा उभा होता परंतू रात्रंदिवस काम करण्याची तयारी ठेवली आणि कॅनरा बँकेतून तेरा लाखाचे कर्ज घेतले. रात्रंदिवस काम केले, पण हप्ता थकू दिला नाही. यामध्ये मला माझ्या मिस्टरांची अनमोल अशी साथ मिळाली. ते माझ्यासोबत उभे राहिले. सुरुवात फक्त हजार रुपये उसने घेऊन सुरू झालेला माझा बिझनेस आता महिन्याला कमीतकमी लाखावर गेला आहे.’ 

नंदा भुजबळ – ९६५७१४५०३५, शिक्रापूर (ता.शिरूर, पुणे)

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *