कोरोनाकाळात नाशिकचे फळभाजीपाला उत्पादक शेतकरी आशा-निराशेच्या झोक्यावर

कोरोनाच्या कठीण काळात नाशिक तालुक्याच्या काही भागातील शेतकऱ्यांना शेतातला माल थेट आसपासच्या शहरात – बाजारपेठेत हातोहात विकण्याची संधी मिळतेय. यामुळे रोजचा घरखर्च भागवणं सोपं झालंय तर काही भागातील शेतकरी मालाला हवा तसा भाव मिळत नसल्याने आणि भाजीपाला नाशिवंत असल्याने पुढचे पीक किती प्रमाणात घ्यावे, पीक घ्यावं कि नाही अशा  अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीने शेतकऱ्यांसमोर नवी आव्हानं उभी केली आहेत. जिथे बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ आहे अशा शेतकऱ्यांसाठी ताजा भाजीपाला उत्पादन आणि विक्री फायद्याची ठरतेय. जिथे बाजार दूर आहे अशा शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ अनिश्चिततेने भरलेला आहे. 

नाशिकच्या एकलहरे भागात  दोन्ही बाजूने दारणा आणि गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे इथले शेतकरी कोथिंबीर, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, मेथी, शेपू या आणि इतर फळभाज्या आणि पालेभाज्या यांची पिके बाराही महिने सतत घेतात. शिवाय बाजारपेठही जवळ असल्याने ताज्या मालाला उठाव आहे. यामुळे रोज रोख धंदा होतो. पैसा थेट हातात येत असल्याने किराणा, इतर घरखर्च लगेच भागवता येतो.

नाशिकमधल्या सिन्नर येथील दापूर गावचे शेतकरी संजय आव्हाड यांचा अनुभव मात्र वेगळा आहे. ते प्रामुख्याने वाल, टमाटे, कार्ले या फळभाज्यांचं पिक घेतात. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी पाच क्विंटल माल सिन्नरच्या आणि नाशिकच्या बाजारपेठेत योग्य भावात विकण्याचा प्रयत्न केला पण सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांची अनुपस्थिती शिवाय मुंबईत यायची दारे बंद असल्याने त्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. मालही नाशिवंत असल्याने मिळेल त्या भावात त्यांना त्यांचा शेतमाल विकावा लागला. केलेला खर्चही निघत नसल्याने निराश असल्याचे त्यांनी सांगितले.

 फळे आणि फळभाज्या परदेशात निर्यात करणारे उद्योजक – संदीप कांगणे

दर्जेदार फळे आणि फळभाज्या परदेशात निर्यात करणारे उद्योजक संदीप कांगणे नाशिकमधून प्रामुख्याने सिझननुसार द्राक्षे, टमाटे आणि कांदे निर्यात करतात. सध्या कांद्याचा सिझन असल्याने ते लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, मालेगाव, उमराणा या नाशिक आणि आसपासच्या पट्ट्यातून कांदे निर्यात करतात. लॉकडाऊनमुळे स्थानिक पुरवठादार बाहेर पडायला असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

नासिक रोड, देवळाली येथील शेतकरी – उत्तम अस्वले

नासिक रोड, देवळाली येथील शेतकरी उत्तम अस्वले यांनी यंदा कांदे, बटाटे, सोयाबीन आणि घास (पशुखाद्य) याचं पिक घेतलंय. सध्या मार्केट फिक्स नाही त्यामुळे पुरेसा भाव नाही असं ते म्हणतात. त्यांनी प्रयोग म्हणून पंजाबहून बटाटा बियाणं लावून पिक घेतलं. शहरानजीक मळा असल्याने पारंपारिक बाजारपेठेपेक्षा जास्त भावात त्यांचा माल नाशिक शहरातच विकला गेला. घरपोच माल देत असल्याने नफा हा दरवर्षीपेक्षा जास्त असून समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *