‘पप्पा अजिबात त्रास होत नाही, मी या मातीसाठी लढतोय’

‘किती दिवस दुष्काळ-दुष्काळ म्हणून बोंबलत बसायचं? यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, म्हणून स्वतःपासून सुरुवात केली. दुष्काळी परिस्थिती विरुद्ध पाऊल उचललं. आज जर मी थोडा त्रास सहन केला, जरा कळा सोसल्या, तर किमान येणाऱ्या काळात तरी माझ्या माणदेशी भागाच्या कपाळावरील दुष्काळी कलंक पुसला जाईल. माता-बहिणींच्या डोक्यावरची कळशी खाली उतरेल. शेतकरी कष्टकरी बळीराजा सुखी होईल. आणि तसा पण मी आता मोठा झालोय. उन-वादळ-वारा, भीती आणि संकटाशी लढायला शिकलोय. माझं सोडा, माझ्यासारखे अनेक जवान सीमेवर अनेक संकटाशी झुंजतायत. रक्त सांडून मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देतायत. या सातारच्या भूमीतून आनेक शुरवीरांनी जन्म घेतला आहे. रक्तरंजीत इतिहास लिहिला आहे. त्याच मातीत मी जन्माला आल्याचा मला गर्व आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी करत असलेला दुष्काळाविरुद्धचा संघर्ष खुपच लहान आहे. पण आज काळाची गरज आहे ती सर्वांनी दुष्काळा विरुद्ध पाउल उचलण्याची. हळूहळू पाऊस पडतोय, प्रत्येकाने किमान एक तरी देशी झाड लावा आणि पाणी घालून जगवा.’ आश्चर्य वाटेल पण हे उद्गार आहेत रोहित शंकर बनसोडे या १८ वर्षाच्या मुलाचे. 

रोहित आणि त्याची १५ वर्षाची लहान बहीण रक्षिता पर्यावरण संरक्षक आणि दुष्काळ निवारणासाठी काम करणारी जोडगोळी आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामधील गोंदवले (खुर्द) गावात रोहित आणि रक्षिता या बहिण भावांची जोडी खेळण्याचं वय असताना त्यांच्या वयोमानाच्या तुलनेत अचाट काम करून विशेष लक्ष वेधून घेत आहेत. रोहित व्यायामासाठी गावाजवळील माळरानावर जात असताना रोज उजाड झालेलं भेसूर माळरान पहात असे. दरवर्षीचा दुष्काळ, आया-बहिणींची पाण्यासाठीची मैलोनमैल पायपीट बघून त्याला सहन होत नसे. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा आणि ही परिस्थिती बदलायला हवी या उद्देशाने रोहित झपाटला आणि ओसाड माळरानावर श्रमदान करण्याचे त्याने ठरवले.  

गेली तीन वर्षे हे दोघे बहीण-भाऊ खोदकामाची हत्यारे घेऊन सातत्याने बांध तयार करणे, झाडे लावून वनराई निर्माण करणे, त्यांची काळजी घेणे आणि विविध प्रयोग करणे अशी कामे करत आहेत. गेल्या तीन वर्षात दोघांनी मिळुन या ओसाड माळरानाचं रुपडं पालटून टाकलंय. तीन हजार झाडे लावुन, वेळोवेळी त्यांची काळजी घेत वनराई निर्माण केली आहे. ही झाडे मोठी होतील तेव्हा मोठे जंगल तयार होईल असं रोहित म्हणतो. श्रमदानातुन ३५ सीसीटी बांध आणि एक माती बांध जनाई तलाव परिसरात तयार करण्याची अवघड कामगिरी दोघांनी फत्ते करून दाखवली आहे. या बांधामध्ये सुमारे १ कोटी लिटर पाणी मुरेल इतकी त्याची क्षमता आहे. रोहित-रक्षिताला या कामामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. एकदा त्याच्यावर लांडग्याचा हल्ला झाला असल्याचे त्यांचे वडिल सांगतात. दोघांचे वडील शंकर बनसोडे यांचा आपल्या मुलांच्या कामाला पाठीमागे  सतत उभ्या असलेल्या एखाद्या डोंगरासारखा पाठिंबा आणि मार्गदर्शन आहे. वडील सोडल्यास या कामासाठी कोणाचेही आर्थिक अथवा इतर स्वरूपाचे सहाय्य नाही. दोघे भाऊ-बहीण हातात हात धरून डोंगर पायथा आणि माळरानं पायी तुडवत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ कामाची ओळख महाराष्ट्राला होतेय. गरज आहे ती फक्त त्यांना कौतुकाची आणि पुरेशा मदतीची. 

या क्रमांकावर तुम्ही रोहित-रक्षिताशी संपर्क साधू शकता – 9503070900, 7620042739

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *