पारंपरिक शेती करण्याबरोबर खजुराची लागवड करणेही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर. वाचा सविस्तर…


खजूर- खारकेचीं अगर खजुरीचीं झाडें सेनेगॉलपासून सिंधू नदीपर्यंतच्या टापूंत होतात. हें झाड मूळचें उत्तर आफ्रिका अगर अरबस्तानांतलें असावें. तेथून तें तैग्रिस व युफ्रोटिसच्या बाजूला म्हणजे मेसापोटेमिया व इजिप्‍तमध्यें गेलें असावें. अरब लोकांनीं तें मोराक्कोमध्यें नेलें व येथून तें स्पेनमध्यें गेलें. हल्ली खजुरीची लागवड अमेरिकेचा कांहीं भाग, क्वीन्सलंड, आस्ट्रेलिया, ट्रिनिदाद इकडे होते. इराण व बलुचिस्तान वगैरे देशांतहि ही लागवड होते. मुलतान, मुझफरगड, वगैरे ठिकाणीं पंजाबांत खजुरीची लागवड बरीच आहे. सिंधमध्यें हल्लीं खजुरीची लागवड बरीच होऊं लागली आहे.
खजुरीला अतिशय उष्ण व कोरडी हवा लागते. यामुळें दुसर्‍या कोठें हीं झाडें झालीं तरी तेथें त्यांनां फळें येत नाहींत. त्याप्रमाणें यांस पाऊसहि फारच थोडा पाहिजे. अलजीरिया, अरिझोना, अलेक्झांड्रिया वगैरे ठिकाणीं ७ ते ९ इंचपर्यंत पाऊस पडतो. त्या ठिकाणीं खजूर तितका चांगला होत नाहीं. परंतु बगदाद, केरो व अलजीरियाचा कांहीं भाग या ठिकाणीं पाऊस ५ इंचांपेक्षां कमी पडतो; तेथील खजूर, खारीक फार नामांकित आहेत. फूल येण्याच्या सुमारास म्हणजे मार्च ते मे महिन्यांत व फळ पिकण्याच्या म्हणजे आगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत पाऊस असल्यास फळ धरत नाहीं किंवा तें कुजूं लागतें. पाऊस थोडा पाहिजे असला तरी झाडें तेवढ्या पावसावर टिकाव धरीत नाहींत; यासाठीं त्यांना पाणी दिलें पाहिजे. ज्या वेळीं पानें कोंवळीं नसतात त्या वेळीं हवेचें उष्णमान फार खालीं म्हणजे २० अंशांपर्यंत उतरलें तरी हरकत नसते. खजुरीला उष्णता किती सहन करवते हें अद्याप समजलें नाहीं. परंतु पृथ्वीवरील कोणत्याहि ठिकाणची अत्यंत प्रखर उष्णता व ऊन सहन करण्यास या झाडास कोणतीहि अडचण पडत नाहीं असें दिसतें. झाड लहान असतांना देखील त्याला ऊन पाहिजे.
जमिनीसंबंधानें खजुरीचें झाड फारसें चिकित्सेखोर नाहीं. परंतु रेताड अगर पुळणवट जमीन असेल तर झाड लवकर लागास येतें व फळहि लवकर पिकतें. वरच्या मातीमध्यें क्षाराचें प्रमाण शेंकडा ३-४ पर्यंत असलें तरी झाड बिघडत नाहीं; पण त्याला फळ मात्र येत नाहीं. फळ येण्यासाठीं झाडाच्या मुळ्या बर्‍याच खोल जाऊन तेथील क्षाराचें प्रमाण शेंकडा अर्धा इतकें उतरावयास पाहिजे.
खजुरीचीं झाडें बीं लावून किंवा त्यांच्या मुळ्यापासून जीं पिल्लें फुटतात तीं लावून करतात. खजुरीचीं नर व मादी अशी भिन्न झाडें असतात. यामुळें बीं लावलें असतां अर्धी नर झाडें निघण्याचा संभव असतो म्हणून चांगल्या मादी झाडांचीं पिल्लें लावणें हा उत्तम मार्ग होय. मादीच्या पन्नास झाडांस एक नर पुरे होतो. मादी झाडाला सोळा वर्षेंपर्यंत बहुधा पिल्लें फुटत असतात. तीं लहान असतांना त्यांवर ओला काथ्या घालून पेटींत भरून तीं परगांवीं पाठविता येतात व त्या स्थितींत तीं तीन महिनेपर्यंत रहातात. झाडें २५ फुटांवर लावावीं. खड्डे तीन फूट हमचौरस घेऊन अर्धा खड्डा, ४ पौंड शेणखत व पेंड अशा खतानें भरावा. झाड लावतेवेळी शेंड्यावर खत, माती वगैरे कांहीं पडणार नाहीं अशाबद्दल काळजी घ्यावी. झाडें लावल्यावर महिनाभर दररोज, दुसर्‍या महिन्यांत चार दिवसांनीं एकदां व नंतर महिन्यांतून एकदां असें पाणी द्यावें. फुलें येण्याच्या सुमारास (फेब्रुवारी व मार्च महिन्यात) पाणी मुळींच देऊं नये. फळ धरल्यापासून तें पिकेपर्यंत पाणी वेळचे वेळेवर द्यावें. झाडें मोठीं होईपर्यंत गहूं, लसूण, घांस ववैरे पिकें घ्यावींत. नंतर अंजीर, डाळिंबें, द्राक्ष वगैरे झाडें लावावींत. दोन अगर तीन वर्षांनीं शेणखत द्यावें. वाळलेलीं पानें वर्षास काढून टाकलीं पाहिजेत. खालचीं पिल्लें दोन वर्षांनीं एकदां काढावीं.


सिंध प्रांतांत झाडें चार किंवा पाच वर्षांची झाली म्हणजे त्यांनां फूल येतें. परंतु झाडें ८-१० वर्षांचीं होईपर्यंत त्यांनां भरपूर पीक येत नाहीं. हीं झाडें १०० वर्षांपर्यंत चांगलें उत्पन्न देतात. नरफुलांचे तुरे असतात. तुर्‍यांची एक एक लहानशी फांदी घेऊन ती मादीफुलांच्या तुर्‍यांवर सैलसर बांधून ठेवतात. नरफुलांचे तुरे काढून ते कागदाच्या पुडींत घालून चांगले बंदोबस्तानें ठेविले तर वर्षभर टिकतात. त्यांचा उपयोग एखादें मादीझाड भलतेच वेळीं फुललें तर त्या झाडासाठीं होतो. घड वाढूं लागले म्हणजे त्यांतील कांहीं काढून टाकतात. या योगानें बाकीचे चांगले पोसतात. एकेका झाडावर ८-१० घड येतात. एकेका घडापासून १० ते १४ पौंड पर्यंत खजूर येतो. दर झाडाचें सरासरी उत्पन्न १२० पौंड समजतात. घडांतील सर्व फळें एकदम पिकत नाहींत; या साठीं जात उत्तम प्रकारची असली तर फळ जसजसें पिकेल तसतसें हातानें एक एक वेंचून काढतात. पण जात बेताचीच असेल तर अर्धीं फळें पिकलीं म्हणजे सर्वच घड उतरून त्यांतील वाईट फळें काढून टाकून तो सावलींत टांगून ठेवतात.


पाण्याच्या, औषध, खतांच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील नीरा, भीमा, कऱ्हा नदीकाठच्या जमिनीमधील क्षारांचे, चोपण होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. यावर उपाय शोधण्याची गरज आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बरामतीने आता क्षारपड जमिनीतील शेतीविषयी मार्गदर्शन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील शिंदीच्या झाडांचा प्रयोग आणि गुजरातमधील खजुराच्या शेतीचा प्रयोग अभ्यासला. त्यातून ही खजुराची शेती भविष्यातील आश्वासक शेती बनू शकते, हा मंत्र शेतकऱ्यांना मिळाला आहे.
बारामती तालुक्यातील नीरा व कऱ्हाकाठच्या शेतकऱ्यांनी नुकताच गुजरात राज्याचा दौरा केला. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्याचे कृषी विज्ञान केंद्र व आत्मा प्रकल्प, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा दौरा काढण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांनी कच्छ भागातील मुंद्रा, धरम, भोजपूर आदी ठिकाणच्या बागा पाहिल्या. खजुराचे राष्ट्रीय संशोधन केंद्रही पाहिले व तेथील उतीसंवर्धित रोपे तयार करण्याच्या प्रयोगशाळाही पाहिल्या. 
• क्षारपड जमिनीसाठी खजूर का ? गुजरात राज्यात सातत्याने नवनवे व व्यावसायिक प्रयोग शेती अथवा सहकार उद्योगात होत असतात, अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. खजुराच्या बाबतीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांनी घेतला. खजूर हे अखाती देशांतील पिक आहे. देशातील राजे-महाराजांच्या काळात तसेच मोगलांबरोबर खजुरही भारतात आला. जगभरातील ४० देशांमध्ये आज खजूर पिकवला जातो. कच्छ परिसरात १९ ते २० लाख खजुराची झाडे आहेत. दहा मादी झाडांमागे एक नर हे प्रमाण खजुराच्या परागीभवनासाठी असावे लागते. अर्थात हे पिक गुजरातमध्ये प्रामुख्याने क्षारपड जमिनींमध्ये घेतले जाते. भेगा पडणाऱ्या काळ्या, भारी जमिनीत खजूर चांगले येत नाही, असा तेथील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये आजमितीस कच्छ, भूज जिल्ह्याच्या भागात असलेली खजूर शेती ही पूर्णतः क्षारपड जमिनींमध्ये आहे. तेथे अगदी २ हजार ते साडेचार हजार टीडीएस (क्षारतेचे प्रमाण) असलेल्या जमिनीत व पाण्यातही खजूर पिक चांगले येते. हे खजूर तेथे व्यावसायिकरीत्या पिकवले जाते. इस्रायली बरही आणि स्थानिक कच्छची म्हणून लाल खजूर, तुर्की, याकुबी, दाऊदी, दाबेशिया या जाती उतीसंवर्धित रोपांपासून अभिवृद्धी करून तेथे पिकवल्या जातात. 
• राष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंद्रा या दौऱ्यात शेतकऱ्यांनी मुंद्रा येथील राष्ट्रीय खजूर संशोधन केंद्राला भेट दिली. येथे शेतकऱ्यांनी खजुरासाठी प्रवाही सिंचन पद्धतीप्रमाणेच ठिबक सिंचन पद्धतीनेही पाणी देता येते, तसेच भूमिगत ठिबक सिंचन प्रणालीनेही पाणी देता येते, याचा अभ्यास केला. मुंद्रा हे संशोधन केंद्र गेल्या काही वर्षापासून खजुराच्या शेतीला प्रोत्साहन देत असून, तेथे संशोधन करून आणंद कृषी विद्यापीठात उतीसंवर्धित रोपे तयार होतात. मुंद्रा भागात खासगी प्रगोगशाळा असून, तेथे उतीसंवर्धित रोपे तयार होतात व परदेशातील अनेक जाती तेथे आयात करून त्यावर संशोधन केले जाते. त्यानंतर या जाती शेतीसाठी वितरीत केल्या जातात. 
• शेतकरी काय म्हणतात ? कच्छ भागातील धरम येथील हुसेनभाई तुर्की यांनी ३६ एकर क्षेत्रात तुर्की, दाऊदी व याकोबी जातीच्या खजुराची शेती केली आहे. या शेतीत त्यांनी नैसर्गिकरीत्या बियांपासून रोपे बनवून, ती बागेत लावली आहेत. त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या खजुराचीच शेती केली जाते. गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून ते खजुराचे उत्पादन घेत आहेत. अवर्षण, सुकाळ किंवा दुष्काळाच्या यांचा विचार करून त्यांनी वेगवेगळ्या जातींची लागवड केली आहे. त्यातून कोणतीही स्थिती उद्भवली, तरी तेथे कोणती तरी एक जात हमखास उत्पादनात अग्रेसर राहते व प्रतिकूल हवामानातही तग धरते, असा त्यांचा नुभव आहे. त्यांच्या दाव्यानुसार एका झाडाला ५० किलोपासून ते २५० किलोपर्यंत खजूर मिळतो. अडीच ते तीन महिने त्यांची काढणी चालू राहते. हे खजूर स्थानिक बाजारात व परदेशात निर्यात करताना दर्जानिहाय प्रतिकिलो ७० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. 
ईश्वरभाई तिंडोरीया यांनी हेमकुंद फार्म खास खजूर बागेचाच केला आहे. ही संपूर्ण बाग उतिसंवर्धित रोपांपासून बनवली आहे. तब्बल ५० एकरांची ही अत्याधुनिक बाग आहे. उतिसंवर्धित असल्याने एका महिन्यातच बागेतील सर्व काढणी पूर्ण होते. येथे खजुराच्या घडाला बॅगिंग करून पावसाळा व किडींपासून संरक्षण केले जाते. या खजुराचा दर्जा उच्च असल्याने त्याची पूर्णतः निर्यात होते. त्यांनी भूमिगत सिंचनप्रणाली वापरली असून, संपूर्ण क्षेत्राला सिंचनासाठी ऑटोमायझेशन यंत्रणा उभारली आहे. संगणकावर आधारित पाणी व्यवस्थापन या बागेला केले आहे. त्यांनी ९ बाय ९ मीटर अंतरावर खजुराची लागवड केली असून, कीड संरक्षणासाठी सौरउर्जेचे संरक्षण सापळे लावले आहेत. ही अत्याधुनिक बाग असून त्यामध्ये प्रतिझाड २०० ते ३०० किलो खजूर एका वर्षाकाठी मिळतो. याची संपूर्ण काढणी एका महिन्यातच पूर्ण होते. खजुराला निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेतही अगदी प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत दर मिळतो. 


• बारामतीत मिळेल नवसंजीवनी गुजरातमधील प्रकल्प पाहण्यामागे शेतकऱ्यांना क्षारपड जमीन व पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे शेती कशी करता येईल, असा दिलासा मिळाला आहे. गुजरातमधील हा प्रकल्प अभ्यासण्याचे कारण म्हणजे तेथे उतिसंवर्धित, नैसर्गिकरीत्या बियांची उगवण करून तसेच मोठ्या झाडाला आलेल्या पिल्लांपासून (मुनवे) तयार केलेल्या नवीन बागा अशा तीनही प्रकारच्या बागा आहेत. त्यामुळे कमीत कमी खर्चात खजुराची रोपे तयार करणे शक्य होणार आहे. लागवडीबरोबरच ज्यांना व्यावसायिकरीत्या उत्पादनावर भर द्यायचा आहे, त्यांना तशा प्रकारच्या उतिसंवर्धित रोपांचाही वापर करता येईल. ज्या क्षारपड जमिनीमध्ये काहीच येत नाही, तिथेही खजूर हा चांगला पर्याय होईल. सध्या शेतीच्या बाबतीत जो हमीभावाचा प्रश्न प्राधान्यक्रमाचा झाला आहे, तोही कमी प्रमाणात सुटेल. नव्या प्रकारची पर्यायी शेती येथे करता येऊ शकेल. बारामती व आसपासच्या तालुक्यांमध्ये क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या शेतीमध्ये एक नवे उत्पादन शेतकऱ्यांना सुरु करता येऊ शकते. खजुराची शेती पन्नास ते साठ वर्षांपर्यंत करता येत असल्याने सातत्याने मशागत, पिक फेरपालट करण्याचीही गरज उरणार नाही. दरवर्षी हमखास उत्पन्न यातून मिळू शकेल. उत्पादनाचा दर्जा राखला तर निर्यातीचीही संधी मिळू शकेल. याखेरीज जिथे पाणीही चांगले आहे व शेतीही बऱ्यापैकी आहे, अशा ठिकाणी बांधावरही खजुराची झाडे लावून बांधाचे संरक्षण आणि उत्पादन असा दुहेरी फायदा घेता येऊ शकेल. 


राजेंद्र पवार, प्रमुख, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती 
सद्यस्थितीत वाढत चाललेल्या क्षारपड जमिनी हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून या शेतीसाठी पर्याय शोधात आहोत. शिंदीची लागवड करणे, नीरा उत्पादन किंवा गूळनिर्मिती असे पर्यायही समोर दिसत आहेत. खजूर हा देखील एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. अर्थात यामध्ये जेव्हा खजुराची झाडे उत्पादनावर असतात, त्या काळात पाणी लागते. या खजुराला क्षारता असलेले पाणीदेखील चालते. खजुराला देशांतर्गत तसेच परदेशातही चांगला भाव मिळू शकतो. एक नवा व्यावसायिक शेतीचा मंत्र यानिमित्ताने शेती आणि शेतकऱ्यांना मिळेल. गुजरातमध्ये शेकडो एकरांवर खजुराच्या बागा आहेत. मात्र, वातावरणाचा विचार करता अगदी बार्शीसारख्या भागातही खजुराची शेती यशस्वी झालेली आहे. संतोष गोडसे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार खजुराच्या बियांपासून चांगल्या प्रकारची रोपे तयार करण्याचा प्रयोगही येथील कृषी विज्ञान केंद्रात केला जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना उतिसंवर्धित रोपे हवी आहेत, ती रोपे लवकर त्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती गुजरातच्या प्रयोगशाळांशी संपर्क व पाठपुरावा करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *