पश्चिम घाटाचं रूप जपणारं राई निसर्ग पर्यटन केंद्र (भाग २)

अमोल लोध यांनी गोळवली, संगमेश्वरमध्ये सह्याद्रीच्या कुशीत ७ एकर जागेवर निसर्ग पर्यटन केंद्र बांधलय. त्यांच्या परीने शेतीचे जमेल तसे प्रयोग ते करत आहेत. प्रयोगामागे शेती व्यावहारिक दृष्टीने परवडणारी व्हावी हा उद्देश आहे. राई निसर्ग पर्यटन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सुविधा शक्यतो नैसर्गिक साधनांपासून करण्याचा प्रयत्न असतो. पिण्याचे पाणी देखील नैसर्गिक प्रवाहातून घेतले जाऊन फिल्टर करून प्यायला उपलब्ध केले जाते. दिव्यांसाठी सौरउर्जेचा वापर तर सुक्या पालापाचोळ्याचा, काटक्यांचा वापर इंधन म्हणून केला जातो.

राई निसर्ग पर्यटन केंद्रात का यावं याचं उत्तर ते फार कविमनाने देतात. ‘आपण इथं यावं गरजेपुरत्या साधनात निसर्गात रहावं. आराम करावा. लहानपणीचे खेळ खेळावेत, चित्र काढावी, फोटो काढावे, वाचन करावं, लेखन करावं, गाणं गावं, संगीत ऐकावं, संगीत निर्माण करावं, मित्रांसोबत गप्पा माराव्यात, स्वतःसोबत बोलावं, स्वतःला ऐकावं, किती कमी साधनात आपण मजेत राहू शकतो ते अवलोकावं. निसर्गातील देव शोधावा, मानवतेतील धर्मासाठी आणि सर्वांच्या शांततेसाठी.

इथं अनुभवी निसर्गाची विविध रूपं, कधी शांत निवांत एकांत, कधी मंद वाऱ्याचं पाण्यासोबतच गाणं, कधी दाट धुक्यात पांघरुन एखादी चांदणी रात्र, सकाळच्या उन्हात चमकणारे दवबिंदू, तर कधी वैशाखाचा उच्छवास व त्यानंतर येणारा पाऊस, त्यासोबतचा मातीचा गंध. कधी ढगांच्या गडगडाटासह येणारा मुसळधार पाऊस तर कधी शेवाळलेली संततधार. त्या अव्याहत जगरहाटी तील व्यवहारांचं अवलोकन करावं या निसर्गाच्या साक्षीनं.

इथे पहावेत वेगवेगळे पक्षी त्यांची खाणी, त्यांची गाणी, त्यांची रहाणी, त्यांचा तो स्वच्छंद विहार, जरी असली उद्याची भ्रांत तरी त्यांचे ते देणे देतच राहतात, आनंदी मनानं अगदी निस्वार्थीपणानं.


निसर्ग आपल्या स्वागतासाठी सदैव तयार आहेच, आपण सहजपणे इथे यावं अन अनुभवावं निसर्गाचं अस्तित्व. इथं आहेत वेगवेगळी झाडं, फुलांची, फळांची, सावली देणारी सावलीत वाढणारी, एकमेकांच्या मदतीनं अस्तित्व टिकवणारी.

अमोल लोध, राई निसर्ग पर्यटन केंद्र
 गोळवली, तालुका संगमेश्वर+91 98221 18855

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *