कण्हेर.. विषारी तरीही उपयुक्त

उष्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणात उगवणारी कण्हेर ही वनस्पती प्रकृतीला विषारी असली तरीही, आपल्या आरोग्याला, विशेषतः त्वचेला कण्हेरीचे फार फायदे होतात. या वनस्पतीची फूले आणि पाने तसेच, सालही त्वचारोगांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

आपण याआधी गणपतीच्या आणि श्रावण महिन्यातल्या इतर पुजांमध्येही लागणाऱ्या पत्राची माहिती करून घेतली आहे. या पत्रीमध्ये असलेली कण्हेरीची फूले आणि कण्हेरीची पाने आपल्या आरोग्यासाठीही फार महत्वाची असतात, हेही आपण वाटले. आज आपण कण्हेर या अत्यंत महत्वाच्या वनौषधीची माहिती घेणार आहोत.

Nerium oleander असे कण्हेर या वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून पांढ-या कण्हेरीची पाने भाजलेल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतात. पांढरी व पिवळी फुले येणारी ही वनस्पती यल्लो ओलिएण्डर या नावानेही प्रसिद्ध आहे. भारतात बिहार, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आदी उष्ण प्रदेशांमध्ये कण्हेर ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते.

कण्हेर ही वनस्पती प्रकृतीने विषारी असते. आयुर्वेदात नऊ उपविषात या कण्हेरी वृक्षाची गणना केलेली आहे. तरीही, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास कण्हेर आरोग्यदायीही ठरू शकते. विषारी असल्यामुळे फक्त बाह्योपचारांसाठीच या वनस्पतीची पाने, फुले वापरण्यात येतात.

कण्हेरीच्या पानांचा लेप योग्य प्रमाणात योग्य वेळी लावला तर भाजल्यानंतर पडलेले पांढरे डागही कमी होतात. कण्हेरीचे साल व मूळ त्वचारोगांवर उगाळून लावले जाते. सुजलेल्या भागावर या पानांच्या काढ्याने शेकले, तर आराम मिळू शकतो. अंगाला खाज सुटणे, जखमा किंवा चट्टे उठणे या समस्यांवर कण्हेरीमुळे चांगला इलाज होऊ शकतो. डोळयांची आग होत असल्यास किंवा डोळ्यांना सूज आल्यास कण्हेरीच्या ताज्या पानांचा वापर करतात.

केसांमध्ये कोंडा, चाई अशा त्वचासमस्या उद्भवल्यास कण्हेरीच्या पानांपासून तयार करण्यात आलेले तेल ठराविक प्रमाणात डॉक्टरी सल्ल्याने नियमित केसांना लावले, तर या समस्या दूर होऊ शकतात. विंचूदंशावरही कण्हेर ही वनस्पती अत्यंत उपयुक्त असून पाळीव प्राण्यांनाही त्वचारोग झाल्यास पांढऱ्या कण्हेरीची हिरवी पाने एरंडेल तेलात जाळून त्याची राख लावतात.

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *