पोळा : मूलतत्त्वांची नव्यानं ओळख करून देणारा सण

पोळ्याला कृषी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. हा विजयदिवस आहे. राबणाऱ्या हातांचा आणि त्या हाताखाली पिढ्यानपिढ्या राबणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचा. शेतीशी निगडीत सगळ्याच घटकांची कृतज्ञतापूर्वक पूजा करून स्वावलंबित्वाचा गर्व करण्याचा हा दिवस. आणि गर्व का करू नये कारण पृथ्वीवर जर कुणी आत्मनिर्भर असेल तर तो शेतकरी बाकी सगळं फोल आहे. पूर्वजांनी सांभाळ केलेल्या आणि पुढच्या पिढ्यांना सुपूर्द केलेल्या खऱ्या आत्मनिर्भर वारशाचं स्मरण करण्याचा दिवस. हा दिवस नकळत गतकाळाच्या अडगळीत बोट धरून घेऊन जातो आणि दाखवतो मूलतत्त्वाचं कोठार. तिथंच दिसतो तिफनीचा एखादा फण आणि त्यावर आज्जीनं किंवा पंजीनं लावलेला कुंकाचा ओबडधोबड टिळा. दाखवतो एखादी जुनकट डाल आणि घोंगडी, आजच्याच दिवशी आज्ज्यानं डोक्यावर घेतलेली आणि त्याभोवती ताटं वाजवून आम्ही भावंडांनी घातलेला गोंधळ, “चौर चौर चांगभला, पाऊस आला घरला चला”. हा दिवस घेऊन जातो जूून्या विहिरीवर,आज्जा आणि त्याच्या मागच्या पिढ्यांची विहीर. पंज्याचा पटका आज्ज्याकडं आला आणि त्या पटक्याच्या सिंहासनावर बसवून आज्ज्यानं नातू वाढवला. त्या नातवाला मागच्या कैक पिढ्यांचा ऋणी राहण्याचा दिवस. का कोण जाणे आज परत त्या विहिरीत डोकावून, “चौर चौर चांगभला” म्हणण्याची इच्छा झालीय. खात्रीशीर सांगतो, आज्जा नक्की आतून प्रतिसाद देईल, “पाऊस आला घरला चला!”

आज्ज्याच्या वृद्ध लिबलिबीत दंडावर डोकं टेकून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या गप्पांमधून नातू स्वतः त झिरपून घेत असतो कैक पिढ्यांचं शहाणपण. हे शहाणपण आज्जा अधाशीपणे नातवात उतरवत असतो कारण नातू हे दोरीचं शेवटचं टोक. म्हटलं तर सुरुवातीचं. एका सुरूवातीचा शेवट दुसऱ्या सुरुवातीला खो देत असतो आणि ही नवीन सुरुवात जुन्या शेवटाच्या काही खुणा घेऊन पुढची वाटचाल करणार असते. त्याच उरल्या सुरल्या काही खुणांचा खो पुढेही मिळत रहावा म्हणून आज्ज्याची धडपड चाललेली असते. खऱ्या अर्थानं नातू हाच आज्ज्याचा खरा वारस. धोतरा पटक्यातला वृद्ध आज्जा हयातभर कमावलेलं शहाणपण आणि त्या शहाणपणाचं मंथन करून हाती लागलेलं तत्वज्ञान नातवाच्या हाती सुखरूपणे देऊन मोकळा होतो. या तत्वज्ञानाची व्याप्ती आणि परिणाम दूरगामी असतात. या तत्वज्ञानाची आठवण करून देणारा हा दिवस. मूलतत्वाशी जोडलं जाण्याचा. मातीत गाडून घेऊन पुन्हा जोमानं उगवण्याची क्षमता असल्याचं भान आणणारा. आपण पशूंना आपलंसं केलं आणि त्यांची पुजा घातली. आई नंतर आपण पशुंचं दूध पिलं आणि पचवलं. हे कशातून साध्य झालं हे पडताळून पाहण्याचा दिवस. मला नेहमी पडत असलेला प्रश्न: सगळ्यात आधी पशुचं दूध कुणी काढलं असेल आणि ते कोणत्या पशुचं असेल आणि ते पाजलं कुणाला असेल? हे मूळ आहे जगात पसरलेल्या आवाढव्य दूध व्यवसायाचं. ते दूध कुणीतरी धाडस करून काढलं, कुणीतरी धाडस करून पिऊन टाकलं आणि पुढं त्याचीच श्वेत क्रांती झाली. तो दूध काढणारा शेतकरीच असणार. आपलाच एखादा पूर्वज. तसंच शेतीच्या हरित क्रांतीचंही मूळ असेल. मुळात पृथ्वीवर धाडस करणारा जर कुणी असेल तर तो शेतकरी. त्यानं चवीला अतिशय आंबट असलेल्या आंब्याला दुसऱ्या एका तुलनेने गोड असलेल्या आंब्याचं पाहिलं कलम केलं असेल आणि त्याचा पहिला आंबा लागण्यासाठी कैक वर्ष वाट पाहिली असेल. एक उदाहरण. संयमाचं.

कदाचित शेतकऱ्याची हीच धाडसी वृत्ती खुपली असावी आणि त्याला आजुन प्रोत्साहन दिले तर तो जगावर राज्य करेल हे कुण्या एखाद्या पिढीच्या चाणक्य सत्ताधाऱ्यांनं ओळखलं असावं आणि पुढील सर्व पिढ्यांचं लक्ष आभासी जगकडं वळवलं असावं. शेतकरी हा स्वयंनिर्मीत आहे. त्याला कुणाच्याही दयेची गरज ना कधी नव्हती ना कधी असेल. तो आणि त्याचा प्रांत पृथ्वीच्या अंतापर्यंत अजिंक्य राहील. (समाप्त)

लेखक – जोतिराम कांदे

(लेखक व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत आणि त्यांना शेतकरी पेशाचा अभिमान आहे)
व्हॉट्सॲप – ७०८३५५२१०४, संपर्क क्रमांक : ८३२९९०६५६६

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *