रताळ्यांचं कोठार – करुंगळे गाव 

श्रावण अगदी तोंडावर आलाय. उपवासाला आणि विविध व्रतांना आता सुरुवात होईल. एकीकडे उपास-तापास सुरू होत असताना कोल्हापूरमधल्या शाहूवाडीतल्या करूंगळे गावात मात्र या काळात वेगळीच लगबग सुरू असते. उपवासासाठी खाल्ला जाणारा मुख्य पदार्थ म्हणजे रताळे. करूंगळे गावातला प्रत्येक शेतकरी या काळात रताळ्याचे पीक घेतो. २०० हेक्टरहुन जास्त जमिनीवर रताळ्याचे पीक घेतले जाते. इतर पिकांपेक्षा हे पीक कमी काळात, कमी गुंतवणुकीत आणि कमी  मशागतीत जास्त नफा मिळवून देत असल्याने या पिकाला इथल्या शेतकऱ्यांची पसंती आहे. या भागात हे पीक जास्त येण्याचे श्रेय हे इथल्या भौगोलिक परिस्थितीलाही जाते. करुंगळे गाव हे डोंगराळ पट्ट्यात येते. माळरानाच्या जमिनीचा विस्तार इथे जास्त आहे. गेल्या १० वर्षांपासून येथे रताळ्याचे पीक घेण्याचे प्रमाण वाढले आहे कारण उसाच्या पिकापेक्षाही जास्त उत्पादन रताळ्याच्या शेतीतून मिळते. 

पावसाळ्याच्या काळात रताळ्याचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. शाहूवाडी तालुक्यातील कडवी खोरा पट्ट्यात आता या पिकाची महती कळली असून या भागातील शेतकरी रताळ्याचे उत्पादन अग्रक्रमाने घेतो. श्रावण सुरु झाल्यापासून गणेशोत्सव, दसरा -दिवाळी- तुळशी विवाहापर्यंत रताळ्याला मोठी मागणी असते. खासकरून वाशी, मुंबई, पुणे, कोल्हापूर या बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी असते. अंदाजे सहा कोटींची उलाढाल यातून होते. गणपती आणि दसरा हा रताळ्याच्या काढणीचा खरा हंगाम मागणी एवढी असते की काही व्यापारी थेट शेतात येऊन मालाची खरेदी करून जातात. मातकटलेल्या मालापेक्षा धुवून स्वच्छ केलेल्या रताळयाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी ओढयाच्या पाण्यात ते धुवून विकणं पसंत करतात. मागणी असलेल्या बाजारपेठेमधले अनेक दलाल इथे तळ ठोकून बसलेले असतात.

उत्पादन खर्च कमी असल्याने रताळी पीक परवडणारे आहे असे इथले शेतकरी सांगतात. रताळी पिकासाठी वेगळ्या बी-बियाण्याची गरज लागत नाही. काढणी नंतर तुटलेली रताळी आणि वेळी शेतातच रहात असल्याने त्याच मातीत रुजून त्यांना नवीन कोंब येतात. हेच नवे कोंब पुन्हा रताळ्याची लागवड करण्यासाठी वापरले जातात.  खरेदी-विक्रीसाठी जवळच बाजारपेठ असावी अशी त्यांची मागणी आहे. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आमच्या गावातली रताळी जास्त चविष्ट असतात असेही इथले शेतकरी ठासून सांगतात. विक्रीतून रोख पैसे मिळत असल्याने इथल्या गावा-गावात रताळ्याचे पीक घेतले जाते. 

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *