संत्री पिकाची लागवड कशी करावी ? 

महाराष्ट्रातील ‘नागपूर संत्रे’ हे त्याच्या अप्रतिम चवीमुळे जगविख्यात आहे. प्रामुख्याने विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते.मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे.

हवामान कसे लागते ? संत्र्याचे झाड १३ ते ३७ अंश या तापमानाच्या कक्षेत व्यवस्थित होते. संत्र्याच्या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मानवते आणि झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

जमीन कशी हवी ? मध्यम काळी स्वरूपाची १ ते १.५ मीटर खोलीची आणि त्याखाली पाण्याचा निचरा होईल अशी मातीमिश्रित मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा वाळूमिश्रित मातीचा ठार असलेली अशी जमीन उपयुक्त ठरते. ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो अशी जमीन लागवडीस उत्तम समजावी. भारी काळ्या जमिनी, ज्यात काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो. अशा जमिनीत पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे झाडाची मुळे सडून पुढे झाडे वाळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्र लागवड करू नये.

मशागत कशी करावी ?  संत्र्याचे पीक घेण्याकरता जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. नागरमोथा, हरळी, कास-कुंध्याच्या मुळ्या वेचून घ्याव्या. वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशित करावी. चढउतार असल्यास जमीन समतोल पातळीत आणावी.

कलमांची निवड कशी करावी ? डोळा भरून तयार केलेल्या कलमांपासून संत्र्याची लागवड केली जाते. कलमांची निवड करतांना ती शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, जोमदार, वाढणारी, जम्बेरी, किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत. संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे व शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावीत.

लागवडीची तयारी
या पिकाच्या लागवडीसाठी ६ X ६ मीटर अंतरावर ६० X ६० X ६० सें. मी. आकाराचे खड्डे घेऊन चौरस पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावेत. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी २५ किलो चांगले कुजलेले शेणखत अधिक दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम १० टक्के क्लोरडेन / ओल्ड्रीन पावडर व जमिनीच्या प्रीष्ठ्भागावरील चांगली माती अथवा गाळाची माती यांच्या केलेल्या मिश्रणाने करून घ्यावेत,

निवड केलेली कलमे मान्सूनचा ३ ते ४ वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्डयात पुरेशी ओल असताना लावावीत. कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभाव नसतो. कलम खड्डयात ठेवल्यावर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्डयात टाकावी. माती हलक्या हाताने दाबावी. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतुमुळे तुटण्याची दाट शक्यता असते. कलम पन्हेरीतून काढताना काही मुळ्या तुटतात. त्यामुळे कालामावरील पानाचे शोषण होत नाही. अशा वेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाळण्याची शक्यता असते. म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत. खुंटावर आलेली फुट (कोंब) जोमाने वाढतात. म्हणून ती वरचेवर काढावी. कलमे लावल्यानंतर कलमांना अंदाजे १ लिटर पाणी देणे योग्य राहील.

पाणी किती आणि कसे द्यावे ?
संत्रा पिकास एका वर्षात साधारणतः 24 ते २५ ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. हिव्वाल्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने. उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलीत करावे. ओलीत देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे तयार करावेत व बाहेरील आळ्यात पाणी द्यावे. कारण झाडाची अन्न व पाणी घेणारी मुले झाडाच्या परीघाकडील भागात पसरलेली असतात. या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही. त्यामुळे डिंक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

खते
संत्र्याच्या झाडास वयोमानानुसार खालील प्रमाणे खताच्या मात्र द्याव्यात

वरील खते देताना सुरुवातीच्या १ ते ५ वर्षेपर्यंत वाढीच्या काळात शेणखत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि रासायनिक खते ३ समान हप्त्यात विभागून जुलै, सप्टेबर व फेब्रुवारी या महिन्यात द्यावीत. वरखते बांगडी पद्धतीने मातीत मिसळून द्यावीत. माती परीक्षण करून पालाशची गरज असल्यास जरुरीनुसार द्यावे.

(संदर्भ: कृषी विभाग – महाराष्ट्र शासन, विकासपिडीया)

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *