सरकार मायबाप आणि प्रजा!

लिंचींग मध्ये राजकारणी जेव्हा मारले जातील तेव्हा क्रांती होईल. बाकी सगळं भंपक आहे. पेन आणि कागदाने क्रांती घडवून आणणाऱ्या सगळ्यांवर जोरदार बलात्कार झालाय किंवा त्यांनी स्वतः हुन व्यवस्थेसमोर काष्टा सोडलाय. नाच सुरु आहे सगळीकडे. आणि जेव्हा बेभान नाच चालतो तेव्हा आवेग एवढा असतो की कधी तुम्ही नागडे होऊन नाचू लागता हे कुणालाच कळत नाही.

एक नागडा झाला तर कदाचित लक्षात आलं असतं. सगळेच नागडे. सगळेच पाशवी. पशू झालोय आपण. अत्यंत हिंस्र पशू. उलट्या दिशेचा प्रवास वेगात चालू झालाय. या प्रवासात जो आडवा येईल, आडवा केला जाईल! कुणीतरी ओरडलं होतं, क्रांती झाली क्रांती झाली! क्रांती कधीच झाली नव्हती, कुणीतरी ठेचलं गेलं होतं. ठेचा ठेचीनं क्रांतीचं रूप घेतलंय आणि डोळे दिपलेत. काहीच दिसेना. आम्ही सगळेच दिव्यांग! आम्हाला ज्या दिवशी दिव्यांग म्हणून संबोधलं गेलं, तो आमचा उपहास होता. आम्ही पांगळे आहोत मायबाप आम्हाला पांगळेच म्हणा. त्यानं आमच्या भावना दुखावत नाहीत.

आमचं शरीर ठेचलं जात आहे. त्याचं दुखणं कुणाला सांगावं. आमच्या लेकी सूना ओरबाडून खाल्ल्या. खूप मोठी क्रांती झाली. जगाला दुमदुमून सोडलं ह्या क्रांतीने. दुमदुमणे मेंदूत गेले आणि सरकारं बहिरी झाली. किंचाळ्या ऐकू न येणाऱ्यांना हुंदका ऐकू जाईल अशी अपेक्षा सोडायला पाहिजे आता. मानवता संपली. मानवतेच्या चितेवर सरकारी मदतीचं कफन सरकारच्या जाहिराती सकट आहे. सरकारनं आता अशी कफणं वाटत सुटलं पाहिजे. जाहिराती सकट.

जेव्हा राजकारण केवळ निवडणूका जिंकण्यापुरतं उरतं तेव्हा कफणं सुद्धा जाहिराती सकट वाटली जातात. निवडणूका जिंकल्या जातात आणि मानवता शेवटचा श्वास घेते. नेत्यांची पूजा होते उदो उदो होतो, त्यांच्या अवतार कार्याची सुरुवात होते आणि प्रजेचा अवतार संपतो. राजकारणी केवळ राजकारणीच असतात हे कळायला इथे वावच नसतो. जेव्हा केवळ आणि केवळ राजकारणी माणसाला सुद्धा प्रजा कसला कसला योद्धा म्हणून संबोधायल लागते तेव्हा त्या राजकारण्याच्या पुढच्या पिढ्यांची सोय केली जाते आणि उलट्या दिशेचा प्रवास सुरू होतो. संवेदना बोथट वगैरे होत नाही, मुळापासून नाहीशी होते. प्रजा कोडगी बनते आणि सत्ताधारी मदमस्त. मानवतेवर सामूहिक बलात्कार होतो, मानवता ठेचली जाते आणि सत्ता कफनाची सोय करते. न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर अजुन एक काळी पट्टी चढवली जाते. न्यायदेवता अजुन दीव्यांग होते. न्याय व्यस्थेसमोर काळाकुट्ट अंधार आणि त्यासमोर चालतो बीभत्स नाच. नागडा नाच. सत्तेचा आणि सत्तेच्या हातात हात घालून प्रजेचा.

आणखी कुठेतरी असंच काहीसं. अजुन कुठेतरी असंच! सत्ता नपुंसक असते! सत्तेनं काहीच बदल घडू शकत नाही. प्रजेला नपुंसक बनवण्याची ताकद मात्र सत्तेत असते आणि शोकांतिका म्हणजे, प्रजेनं ते नपुंसकत्व स्वीकारलं आहे. या नपुंसक जगात प्रजेच्या लेकी सुना सुरक्षित नाहीत. फक्त शरम वाटून चालणार नाही, नाहीसं व्हा! आता प्रजेनं केवळ मुलांना जन्म घालावा आणि त्यांचा सांभाळ करावा आणि स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही असा कायदा रातोरात अमलात आणावा. वाटल्यास सत्तेनंच अशी सक्ती करावी जेणेकरून सत्तेला कुणी प्रश्न विचारणार नाही. एकदा मुलांना जन्म घालून झाला की सगळ्या स्त्रियांना रातोरात एकाच चितेत टाकून कार्य उरकून घ्यावं आणि कुठं काय म्हणून आपापल्या कामाला निघावं.

जोतिराम कांदे – ७०८३५५२१०४

(लेखक व्यवसायाने आयटी क्षेत्रात असून मनाने शेतकरी आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *