शेतीकडे वळलेल्या एका अभियंत्याची गोष्ट (भाग ३)

आत्मनिर्भरता आणि शेतीकडे टाकलेले पाऊल आणि यातून निर्माण झालेले मोती याची अनुभूती मी स्वतः घेतली. लॉकडाऊनच्या काळात घराकडील शेतातील चार गुंठ्यांत म्हणजे अंदाजे ४००० चौ.फु. क्षेत्रात केलेली भाजीपाला लागवड आता ४५ दिवसानंतर यशस्वी होऊ लागलीय. पडवळ, कारली, दोडकी, वाल, भोपळा, चिबुड, भेंडी, गवार, टोमॅटो, चवळी, मिरची, मुळा, लाल माठ, वांगी आदी भाजी अगदी तयार झालीय आणि त्यात विशेष म्हणजे काकडीच्या वेलावर काकडीचे अमाप मोती वेलाला बिलगले आहेत. खरं तर हे श्रमाच मोल पाहून मन खूप आनंदित होत त्याहीपेक्षा या कष्टातून मिळालेलं पीक आणि त्याच्या विक्रीतून मिळालेले त्याच मोल खूप कमी असेल पण हे आजपर्यंत अनेक व्यवसाय करून यशस्वी झालो त्याही पेक्षा खरच कितीतरी पटीने मोठं आहे याचा आनंद होतो. शेवटी “आत्मनिर्भर” म्हणजे काय तर स्वकष्टाने स्वतःचा पायावर उभे राहण्याची ताकद म्हणजे ‘आत्मनिर्भरता’ आणि ती श्रम, कष्ट यातूनच निर्माण होऊ शकते हे वास्तव आहे, ते नाकारून चालणार नाही. 

नव्या पिढीने आता नोकरीच्या मागे न लागता शेतीविषयकपूरक व्यवसाय शोधून काढून ते सुरू केले पाहिजेत. श्रम हेच यश आहे हे सूत्र अंगीकारून पुढच पाऊल उचलल पाहिजे आणि या ‘कोरोना’ महामारी शी मुकाबला करताना ‘लॉकडाऊन’वर मात केली पाहिजे. मित्रहो माझ्या बऱ्याच मित्रांचा प्रश्न होता की आपण शेतकरी आहात का? मी मुळात शेतकरी कुटुंबातलाच, पण शिक्षण स्थापत्य अभियंता, व्यवसाय, बांधकाम, पेट्रोल पंप, हॉटेल, गोल्ड ज्वेलर्स यात श्रमाचे मोती पिकवून मी लॉकडाऊनच्या काळात शेतीकडे वळलो आणि शेती हा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो याची प्रचिती आली.

याच अनुषंगाने मी ‘ऍग्रो टुरिझम’ ही शेतीविषयक पूरक अशी व्यावसायिक संकल्पना साकार करायची असा संकल्प केलाय. मला निश्चित खात्री वाटते या माझ्या शेतीविषयक पाऊल वाटेवर अनेक तरुण मित्र येतील आणि यशस्वी सुद्धा होतील पण काळाची गरज आहे की तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती आणि शेतीविषयक उपक्रम राबवावेत एवढीच या लेखनातून माझी अपेक्षा आहे. 

संतोष कदम – 9422435855

Posted in: Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *